यू-19 आशिया चषक क्रिकेट भारत उपांत्य फेरीत
यूएईवर 10 गड्यांनी मात, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेची नाबाद अर्धशतके
शारजाह
भारताचा 13 वर्षीय वंडरबॉय वैभव सूर्यवंशीने त्याच्याभोवती निर्माण झालेल्या वलयाला साजेशी कामगिरी केल्यानंतर भारताने यू-19 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात संयुक्त अरब अमिरातवर 10 गड्यांनी दणदणीत विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली.
प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर यूएईने ठरावीक अंतराने बळी गमविले आणि त्यांचा डाव 44 षटकांत 137 धावांत आटोपला. मध्यमगती गोलंदाज युधजित गुहा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 15 धावांत 3 बळी टिपले तर चेतन शर्माने 27 धावांत 2 व अष्टपैलू हार्दिक राजने 28 धावांत 2 बळी मिळविले. त्यानंतर भारताने 16.1 षटकांत विजयाचे उद्दिष्ट एकही गडी न गमविता गाठले. सलामीवीर सूर्यवंशीने 46 चेंडूत नाबाद 76 तर आयुष म्हात्रेने 51 चेंडूत नाबाद 67 धावा फटकावल्या.
अलीकडेच झालेल्या आयपीएल महालिलावात राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतल्यानंतर 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीबद्दल कुतूहल जागे झाले होते. आयपीएलच्या इतिहासातील लिलावात सहभागी झालेला तो सर्वात युवा खेळाडू बनला आहे. येथील सामन्यात डावखुऱ्या सूर्यवंशीने आपल्या खेळीत 3 चौकार व 4 षटकारांची नोंद केली. त्याचा जोडीदार म्हात्रेने आपल्या खेळीत 4 चौकार व 4 षटकार ठोकले. सूर्यवंशीचे सर्व षटकार काऊ कॉर्नर क्षेत्रात मारलेले होते.
भारताने या स्पर्धेची सुरुवात निराशाजनक झाली होती. त्यांना पाककडून 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला व आता यूएईवर एकतर्फी मात केली. भारताची उपांत्य लढत ब गटातील अव्वल संघ लंकेशी होईल तर दुसरा उपांत्य सामना अ गटातील अव्वल संघ पाक व बांगलादेश यांच्यात होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : यू-19 संयुक्त अरब अमिरात संघ 44 षटकांत सर्व बाद 137 : मुहम्मद रयान 35, युधजीत गुहा 3-15. चेतन शर्मा 2-27, हार्दिक राज 2-28, आयुष म्हात्रे 1-19. यू-19 भारत संघ 16.1 षटकांत बिनबाद 143 : वैभव सूर्यवंशी नाबाद 76, आयुष म्हात्रे नाबाद 67.