खत पुरवठ्यासाठी मिशन मोडमध्ये भारत
रशिया, मोरक्को, इजिप्त, बेलारुसमवेत अनेक देशांकडून आयात करणार
पश्चिम आशियात सुरु असलेल्या संघर्षाचा प्रभाव जगभरातील देशांमध्ये दिसून येतोय. इराणसोबत अमेरिका-इस्रायलच्या युद्धामुळे कच्चे तेल आणि गॅसच्या संकटाला अनेक देश सामोरे जात आहेत, तर खतांच्या पुरवठ्यावरही याचा स्पष्ट प्रभाव दिसून येतोय. अशास्थितीत खतांचा पुरवठा अस्थिर होण्याची शक्यता पाहता भारताने नायट्रोजन आणि फॉस्फेट आधारित खतांवरून खास रणनीति अवलंबिली आहे. यासाठी प्रमुख उत्पादक आणि निर्यातदारांसोब पर्यायी स्रोत सुरक्षित करण्यासाठी बोलणी सुरू आहेत.
भारतीय दूतावास सक्रीय
खत पुरवठ्यावरून जवळपास 20 देशांमध्ये भारतीय दूतावास युद्धपातळीवर काम करत आहेत. हे दूतावास स्थानिक खत कंपन्यांसोबत बैठका करत आवश्यक पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करत आहेत. सूत्रानुसार भारताने भात, सोयाबीन आणि मका यासारख्या पिकांमध्ये वापर होणाऱ्या यूरिया आणि डाय-अमोनियम फॉस्फेटच्या पुरवठ्यासाठी रशिया, इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम, अल्जीरिया आणि इजिप्तशी संपर्क साधला आहे. खतांची आयात वाढविण्यासाठी मोरक्को, जॉर्डन आणि बेलारुससोबत देखील चर्चा जारी आहे.
अनेक देशांवर होता निर्भर
सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि संयुक्त अरब अमिरात यासारख्या देशांसमवेत पश्चिम आशिया भारताची जवळपास 30 टक्के यूरिया, 30 टक्के हाय-अमोनियम फॉस्फेट आणि खत उत्पादनात वापर होणाऱ्या एलएनजीची निम्मी आवश्यकता पूर्ण करतो. या क्षेत्रातून पुरवठ्यात अडथळे खरीप किंवा मान्सूनच्या महत्त्वपूर्ण पिकाच्या पेरणीच्या हंगामापूर्वी निर्माण झाले आहेत.
रशियाकडून आश्वासन
रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव यांनी मागील आठवड्यात भारताच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना खतांसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती दिली. रशियाने डिसेंबर 2025 पासून भारताला खनिज खतांच्या पुरवठ्यात 40 टक्क्यांची वृद्धी केली आहे. रशिया भारताच्या वाढत्या खत आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी तत्पर असल्याचे आश्वासन मंतुरोव यांनी दिले आहे. तसेच दोन्ही देशांनी यावेळी खत निर्मिती संयुक्त प्रकल्पाच्या स्थापनेत झालेल्या प्रगतीवरही चर्चा केली.
खतांसंबंधी योजना
भारतीय खत कंपन्या आरसीएफ, एनएफएल आणि आयपीएलने रशियाच्या यूरालकेम समुहासोबत रशियात एक संयुक्त यूरिया निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यासाठी डिसेंबरमध्ये एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. प्रस्तावित 1.2 अब्ज डॉलर्सच्या या प्रकल्पाचे लक्ष्य 2027-28 पर्यंत प्रतिवर्ष 20 लाख टन यूरियाचे उत्पादन करणे आहे, ज्याच्या मदतीने भारताच्या पुरवठा सुरक्षेला मोठी मजबुती मिळेल आणि आयात खर्च कमी करण्यास मदत मिळणार आहे.
कंपन्यांकडे महत्त्वाची जबाबदारी
ओसीपीकडे भारताची अग्रगण्य खत कंपनी पारादीप फॉस्फेट्समध्ये 28 टक्के हिस्सेदारी आहे. तर इंडो मारोक फॉस्फोर एसए (आयएमएसीआयडी) हे चंबळ फर्टिलायजर्स अँड केमिकल्स आणि टाटा केमिकल्ससोबत त्याचा संयुक्त उपक्रम आहे. भारतात खत उत्पादनासाठी आवश्यक कच्च्या मालाचा पुरवठा सुनिश्चित करण्यास ही कंपनी मदत करत आहे.
उत्तर आफ्रिकेशी संबंध मजबूत करतोय भारत
-उत्तर आफ्रिकेत भारत कृषी मागणी पूर्ण करण्यासाठी इजिप्तसोबत खत संबंधांना सक्रीय स्वरुपात मजबूत करत आहे.
-याच्या अंतर्गत इजिप्तकडून मोठ्या प्रमाणात खनिज, नायट्रोजनयुक्त आणि पोटॅशियमयुक्त खतांची आयात केली जातेय.
-इजिप्तकडून खनिजयुक्त अन् पोटॅशियमयुक्त खतांची आयात ही 29 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याची राहिली आहे.
-सहकार्यात दीर्घकालीन करार आणि सुएज कालवा आर्थिक क्षेत्रात नव्या खत प्रकल्पांमध्ये संभाव्य भारतीय गुंतवणूक सामील आहे.
-भारताकडून इजिप्तमध्ये 4.5 अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याची उल्लेखनीय गुंतवणूक करण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रासमोरील संकट रोखण्याच्या हालचाली
-नायट्रोजन अन् फॉस्फेट आधारित खतांकरता खास रणनीतिचा अवलंब
-20 देशांमधील भारतीय दूतावासांकडून खत पुरवठ्यासाठी बोलणी सुरू
-रशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, अल्जीरिया, जॉर्डन, बेलारुसशी संपर्क
-रशियाच्या यूरालकेम समुहाच्या सहकार्याने खतउत्पादन प्रकल्प स्थापणार
-खतांसाठी आवश्यक कच्चा माल अधिकाधिक मिळविण्याचे प्रयत्न सुरू