भारताचे इस्रायलशी अनेक करार
संरक्षण, कृषी आदी महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्य
► वृत्तसंस्था/ तेल अवीव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि इस्रायल यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार करण्यात आले असून या करारांचा भारताला मोठा लाभ होणार आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्येही महत्वपूर्ण वाटाघाटी करण्यात आल्या.
चर्चा पार पडल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या दौऱ्यामुळे भारत आणि इस्रायल यांचे संबंध नव्या उंचीवर पोहचले आहेत. मला इस्रालयने ‘स्पीकर ऑफ द नेसेट’ हे सन्मानाचे पदक देऊन माझा सत्कार केल्यासाठी मी इस्रायलचे आभार मानतो. मी हा सन्मान भारताच्या 140 कोटी लोकांना अर्पण करतो. आम्ही द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा केली असून, संरक्षण आणि कृषीसह अनेक क्षेत्रांमध्ये निकटचे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत करण्यामध्ये दोन्ही देश एकमेकांना साहाय्य करतील, असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवाद रोखण्यासाठीही दोन्ही देश एकत्रित काम करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
बैठकीत कोणते निर्णय...
भारत आणि इस्रायल यांनी क्रिटिकल टेक्नॉलॉजी क्षेत्रात सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच औद्योगिक भागीदारीलाही बळ देले जाणार आहे. इस्रायलमध्ये ‘युपीआय’ ला अनुमती देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे डिजिलट पेमेंट करणे शक्य होणार आहे. दोन्ही देश अणुऊर्जा क्षेत्र आणि अंतराळ संशोधन क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्य करणार आहेत. कृषीला आधुनिक आणि भविष्यानुकूल स्वरुप देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे. या क्षेत्रात नवे तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितरित्या संशोधन करतील असा निर्णय झाला. संरक्षण क्षेत्रात नव्या शस्त्रांसाठी तंत्रज्ञान विकास करण्यात दोन्ही देश कार्य करणार आहेत, अशी माहिती दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार विभागांनी दिली.
मुक्त व्यापार करार होणार
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार करण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी या संदर्भात चर्चा पुढे नेली आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार करण्यात येईल, असे प्रतिपादन दोन्ही देशांच्या प्रतिनिधींकडून केले गेले.
दहशतवादाविरोधात ठोस संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी दहशतवादाच्या विरोधात ठोस संदेश दिला आहे. मानवता कधीही युद्ध आणि संघर्ष यांची शिकार होता कामा नये. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश दहशतवादाच्या विरोधात आपला एकत्रित संघर्ष करतच राहतील. गाझा शांती योजनेने या संदर्भात एक मार्ग मोकळा केला आहे. भारताचा या धोरणाला पाठिंबा आहे. दहशतवादाला या जगाच्या पाठीवर कोठेही स्थान मिळता कामा नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.
व्यापारी कॉरीडॉर बनणार
भारत-मध्यपूर्व-युरोप असा व्यापारी कॉरीडॉर निर्माण करण्याच्या योजनेला भारताने पाठिंबा दिला आहे. भारत आणि इस्रायल हे या व्यापक योजनेतील महत्वाचे सहभागी देश आहेत. हा कॉरीडॉर पूर्ण झाल्यास जागतिक व्यापाराला मोठी चालना मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांनी वेगाने हालचाली कराव्यात असे आवाहन करण्यात आले. हा प्रकल्प ‘आयएमईसी’ म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पामुळे भारत आणि इस्रायल हे देश एकमेकांच्या अधिक जवळ येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
इस्रायलच्या राष्ट्रपतींशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती इशॅक हर्जोग यांच्याशी चर्चा केली. इस्रायलच्या धोरणात भारताला मध्यवर्ती स्थान आहे, असे उद्गार अध्यक्ष हर्जोग यांनी काढले. दोन्ही देश एकमेकांशी सहकार्य कसे वाढवू शकतील, यावर ही चर्चा प्रामुख्याने झाली. दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होणे आवश्यक आहे, या भूमिकेवर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले असे स्पष्ट केले गेले.
भारत आणि इस्रायल यांच्यात कोणते करार...
- संरक्षण आणि रणनीती क्षेत्रात सहकार्य, संयुक्त तंत्रज्ञान विकास, भागीदारी
- लवकरात लवकर मुक्त व्यापार करार करण्यासाठी वेगाने चर्चा केली जाणार
- इस्रायलमध्ये युपीआयच्या माध्यमातून आर्थिक देवघेवीला इस्रायलची मान्यता
- अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान यांचा संयुक्त विकास होणार
- सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार, लेटर ऑफ इंटेंट करण्यावर दिला भर
- भारत आणि इस्रायल कृषी संशोधन प्राधिकरण स्थापन करण्यावर सहमती
- मत्स्यपालन, अॅक्वाकल्चर या क्षेत्रांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा विकास होणार
- ऊर्जा निर्मिती, भूगर्भीय संपत्तीचा विकास करण्यासाठी एकमेकांना साहाय्य
- दोन्ही देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी संयुक्त प्रयत्न केले जाणार
- व्यापार, सेवा, गुंतवणूक वस्तू उत्पादन, आतिथ्य क्षेत्रात संयुक्त भागीदारी
- आयएफएससीए आणि इस्रायल रोखे प्राधिकारण यांच्यात महत्वाचा करार