‘त्या’ दिवशी भारताची 9 क्षेपणास्त्रs होती सज्ज
इम्रान खान करत होते कॉलवर कॉल : अभिनंदन पाकच्या ताब्यात असतानाची कहाणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
27 फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानने भारतीय वायुदलाचे लढाऊ वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पकडत त्यांना सोडणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु त्याचदिवशी भारताने स्वत:च्या 9 क्षेपणास्त्रांचे तोंड पाकिस्तानच्या दिशेने वळविले होते. तसेच त्यांना पाकिस्तानच्या सीमेनजीक तैनात करण्यात आले होते. यामुळे दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये तणावाचे वातावरण होते.
भारताने स्वत:च्या क्षेपणास्त्रांना सीमेच्या दिशेने वळविल्यावर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान आणि त्याच्या सैन्याचा आवेश गळून पडला होता. इम्रान खान हे सातत्याने पंतप्रधना नरेंद्र मोदींशी संपर्क साधण्यासाठी कॉल करत होते. पूर्वी पाकिस्तान दाखवत असलेला तोरा क्षेपणास्त्रांचे तोंड वळताच पूर्णपणे उतरला होता. पाकिस्तान चर्चेसाठी याचना करू लागला होता असा खुलासा माजी राजदूत अजय बिसारिया यांनी स्वत:चे नवे पुस्तक ‘अँगर मॅनेजमेंट : द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स बिटविन इंडिया अँड पाकिस्तान’मध्ये केला आहे.
इम्रान खान हे थेट पंतप्रधान मोदींशी बोलू इच्छित होते, त्या रात्रीला पंतप्रधान मोदींनीही नंतर ‘कत्ल की रात’ असे संबोधिले हेते. 27 फेब्रुवारी 2019 रोजी अभिनंदन यांनी पाकिस्तानी एफ-16 विमान पाडविले होते. परंतु यादरम्यान त्यांच्या लढाऊ विमानावर पाकिस्तानी क्षेपणास्त्र आदळले होते. यामुळे त्यांनी इजेक्ट केले होते आणि ते पाकिस्तानात कोसळले होते.
क्षेपणास्त्रांची दिशा वळविताच..
अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने स्वत:च्या ताब्यात घेतले हेते. याप्रकरणी पाकिस्तानी सैन्याने तोरा दाखविताच भारत सरकारने क्षेपणास्त्रांची दिशा पाकिस्तानच्या बाजूने वळविली होती. यामुळे पाकिस्तान घाबरून गेला होता. भारतीय सैन्याच ही तयारी पाहून पाकिस्तान सैन्य आणि सरकार हादरून गेले होते. पाकिस्तानचे भारतातील तत्कालीन राजदूत सोहेल महमूद यांनी बिसारिया यांना फोन करून इम्रान खान हे पंतप्रधान मोदींशी बोलू इच्छितात असे कळविले होते. बिसारिया यांनी दिल्लीशी संपर्क साधला होता. तेथून प्राप्त निर्देशांनंतर पंतप्रधान मोदी हे पुढील काही तास उपलब्ध नसल्याचे बिसारिया यांनी महमूद यांना कळविले होते.
शांततेसाठी मुक्ततेचा दावा
28 फेब्रुवारी रोजी अभिनंदन यांच्या मुक्ततेची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत केली होती, त्यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान मोदींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. शांततेसाठी अभिनंदन यांना सोडत आहोत असा दावा इम्रान यांनी केला होता. परंतु प्रत्यक्षात भारताच्या क्षेपणास्त्रांच्या भीतीमुळे पाकिस्तानने हे पाऊल उचलले होते. भारताने अमेरिका आणि इंग्लंडच्या राजदूतांना स्वत:च्या पुढील पावलाविषयी माहिती दिली होती.