दुबईत कसे खेळायचे याचे भारतासमोर स्पष्ट चित्र
न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचे मत, किवींना लाहोरमध्ये लाभलेल्या अनुकूलतेशी केली तुलना
वृत्तसंस्था/दुबई
न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसनच्या मतानुसार, भारत त्यांचे सर्व चॅम्पियन्स ट्रॉफी सामने एकाच ठिकाणी खेळले आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर दुबईमध्ये कसे खेळायचे याबद्दलचे चित्र स्पष्ट आहे. विल्यमसनने भारताला एकाच ठिकाणी खेळण्याची अनुकूलता लाभलेली आहे, असे स्पष्टपणे म्हटले नाही. त्याने त्याची तुलना न्यूझीलंडला लाहोरमधील परिचित असलेल्या परिस्थितीशी केली. लाहोरमध्ये त्यांनी बुधवारी दक्षिण आफ्रिकेला हरवून रविवारी दुबईमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाविऊद्धच्या अंतिम सामन्यात स्थान मिळविले.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या मागील तिरंगी मालिकेत न्यूझीलंड संघ लाहोरमध्ये दोन सामने खेळला होता. ‘मला वाटते की, दुबईत अनेक वेळा खेळल्याने त्यांच्यासमोर तिथे नेमके कसे खेळायचे याबद्दल खरोखर स्पष्ट चित्र आहे. हे काहीसे आम्हाला येथे मिळालेल्या संधीसारखेच आहे. या ठिकाणी आम्ही अनेक वेळा खेळलेलो आहे आणि मला वाटते की, ही बाब क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे’, असे विल्यमसन म्हणाला. भारताला दुबईतील ठिकाण चांगलेच परिचियाचे आहे आणि त्याची त्यांना अनुकूलता मिळणार का याविषयी विचारले असता त्याने वरील उत्तर दिले.
सेमीफायनलमध्ये शतक झळकावलेले असल्याने विल्यमसनचा आत्मविश्वास वाढला आहे आणि तो अंतिम फेरी खेळण्यास उत्सुक आहे. ‘भारत सर्व सामने दुबईत खेळला आहे हे तर झालेच. आमचे लक्ष पुढील सामन्यावर केंद्रीत झाले आहे. त्या सामन्याचे स्थान, विरोधी संघ हे सर्व घटक आहेतच. अर्थात आम्ही एकदा तिथे भारताविऊद्ध खेळलेलो आहोत’, असेही विल्यमसन म्हणाला. ‘परिस्थिती वेगळी आहे. पण आम्ही काही अनुकूल बाबींचा लाभ उठवणे व त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे’, असेही त्याने सांगितले.
उपांत्य फेरीत विल्यमसन आणि रचिन रवींद्र या दोघांनीही शतके झळकावून न्यूझीलंडचा विजय निश्चित केला. विल्यमसनने तीन सामन्यांत दोन शतके झळकावलेल्या रवींद्रला एक विशेष प्रतिभा म्हटले आहे. ‘ही अंतिम फेरी आहे, म्हणून हा सामना जास्त रोमांचक वाटत आहे. रचिनच्या बाबतीत सांगायचे झाल्यास तो एक विशेष प्रतिभेचा खेळाडू आहे. त्याच्यासोबत फलंदाजी करणे नेहमीच उत्तम अनुभव असतो. तो मैदानावर जातो आणि संघाचा प्रथम विचार करतो’, असेही त्याने पुढे सांगितले.