भारत-जर्मनी आज उपांत्य लढत
वृत्तसंस्था / चेन्नई
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी यजमान भारत आणि बलाढ्या जर्मनी यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. भारतीय हॉकी संघाला तब्बल 9 वर्षानंतर पुन्हा या स्पर्धेचे जेतेपद मिळवावयाचे असेल तर भारतीय हॉकीचा दर्जा त्यांना रविवारच्या सामन्यात सुधारावा लागेल. स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होईल.
भारतीय हॉकी संघाने 2016 लखनौमध्ये झालेल्या या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. त्यानंतर भारतीय हॉकी संघाला म्हणावे तसे यश या स्पर्धेत मिळू शकले नाही. जर्मनीच्या हॉकी संघानके आतापर्यंत सातवेळा ही स्पर्धा जिंकली असून सध्या ते या स्पर्धेतील विद्यमान विजेते आहेत. चेन्नईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारताना चिली, ओमान आणि स्वीस विरुद्धच्या सामन्यात 29 गोल नोंदविले आहेत. माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कनिष्ठ हॉकी संघाची रविवारच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खरी सत्वपरीक्षा ठरणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीमध्ये भारताने बेल्जियमचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. भारतीय संघातील मनमीत सिंग, दिलराज सिंग, अजित यादव, सौरभ आनंद कुशावह आणि अर्शदीप सिंग यांना दर्जेदार खेळ करावा लागेल. पासेस देताना योग्य समन्वय भारतीय खेळाडूंना राखावा लागेल तर पेनल्टी कॉर्नरचा लाभ अचूक उठविणे गरजेचे ठरेल. या स्पर्धेत जर्मनीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कडव्या फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. जर्मनीचा गोलरक्षक जेस्पर डिझेर याची कामगिरी या स्पर्धेत आतापर्यंत भक्कम झाली असल्याने भारतीय संघातील आघाडी फळीला अधिक वेगवान आणि आक्रमक खेळावर भर द्यावा लागेल.