भारत-जर्मन हॉकी लढत आज
वृत्तसंस्था, अॅमस्टेलव्हेन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या व़िव चषक हॉकी स्पर्धेत गुरुवारी भारत आणि जर्मनी यांच्यात पाचव्या स्थानासाठी प्ले ऑफ सामना खेळविला जाणार आहे.
या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने यावेळी आतापर्यंत पाचपैकी केवळ 1 सामना गमविला आहे. तसेच या स्पर्धेच्या गेल्या 52 वर्षांच्या इतिहासामध्ये भारतीय महिला हॉकी संघ विजयाने समारोप करण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत दोनवेळा विश्व चॅम्पियनशिप मिळविणाऱ्या बलाढ्या जर्मनीवर विजय मिळविण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. 1974 साली पहिल्यांदा झालेल्या विश्व चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारताने चौथे स्थान मिळविले होते. मात्र या स्पर्धेमध्ये भारताचे उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न यापूर्वीच संपुष्टात आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना गोलशुन्य बरोबरीत राहिल्याने भारताला उपांत्य फेरीची संधी हुकली. रविवारच्या सामन्यानंतर आता भारताला तीन दिवसांची विश्रांती मिळाली असून गुरुवारच्या सामन्यात ते जर्मनीवर मात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाला गुरुवारच्या सामन्यात विजयाची आशा वाटत आहे. आशियाई स्पर्धेतील महिलांच्या हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळविणारा संघ 2028 च्या लॉस एन्जिल्स ऑलिम्पिक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरेल.