भारत-फ्रान्स यांचा संयुक्त लष्करी सराव
‘शक्ती-8’ अंतर्गत कवायती : भारतीय जवानांकडून पराक्रम अन् समन्वयाचे दर्शन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि फ्रान्सच्या सैन्यांमधील चालू संयुक्त लष्करी सराव शक्ती-8 दोन्ही देशांच्या सैन्यांमधील सामरिक सहकार्य आणि ऑपरेशनल पातळीवरील समन्वय अधिक मजबूत करत आहे. हा सराव फ्रान्सच्या दक्षिण भागात असलेल्या ला कॅव्हलेरी येथील कॅम्प लार्झाक येथे आयोजित करण्यात आला आहे. या सरावात भारताकडून जम्मू काश्मीर रायफल्स बटालियनचे सुमारे 90 सैनिक सहभागी झाले आहेत, तर फ्रेंच सैन्याकडून 13 व्या डेमी-ब्रिगेड डी लीजन एट्रांगेरे (परदेशी सैन्य ब्रिगेड) जवानांनी सहभाग दर्शवला.
हा लष्करी युद्ध सराव शहरी आणि अर्ध-विकसित भागात आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान, दोन्ही सैन्यांनी शहरी युद्ध, अडथळा ओलांडणे, संयुक्त गस्त घालणे आणि सैन्य तैनात करणे यासारखी अनेक प्रात्यक्षिके दाखविली. हे सर्व सराव वास्तविक युद्ध परिस्थितीनुसार आयोजित करण्यात आल्यामुळे सैनिकांची सामरिक लवचिकता आणि चपळता सुधारली. याचदरम्यान, तज्ञांच्या पथकांनी रेडिओ सिग्नल कॅप्चर, जॅमिंग, स्पेक्ट्रम नियंत्रण आणि ड्रोन न्यूट्रलायझेशन यासारख्या आधुनिक तंत्रांचा सराव केला. या माध्यमातून दोन्ही सैन्यांची आधुनिक युद्धभूमीत काम करण्याची क्षमता बळकट झाली.