कापडासह इतर निर्यातीकरीता ब्रिटनवर भारताचे लक्ष
कापड निर्यात दुप्पट होणार : कार निर्मात्यांनाही असणार संधी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
15 जुलैपासून भारत आणि युनायटेड किंग्डम (युके)यांच्यातला करार अंमलात येणार आहे. याच दरम्यान भारताची कापड निर्यात सदरच्या देशाला पुढील तीन ते चार वर्षांच्या कालावधीत दुप्पट होणार असल्याची माहिती आहे. एवढंच नाहीतर वाहन निर्यातीतही भारताला संधी साधता येणार आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातला करार अंतिम वळणावर पोहचला आहे. येत्या 15 जुलैपासून तो अंमलात येईल असे म्हटले जात आहे. निर्यातीच्या बाबतीत बांगलादेश, पाकिस्तान, व्हिएतनाम आणि टर्की यांना टक्कर देण्यासाठी भारत आगामी काळात तयार असणार आहे.
पश्चिम आशियातील युद्धाचे सावट आता संपले असून भारताचा युके सोबतचा करार 15 जुलैपासून लागू होणार आहे. याचा फायदा देशातील कापड उद्योगाला उठविता येणार आहे. सध्याला 6.7 टक्के वर्षाला विकास साधणारे हे क्षेत्र येत्या काळात 10 ते 12 टक्के इतके विकसित होणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये हा सुखावह बदल दिसून येणार आहे.
3 अब्ज डॉलर्सची होणार निर्यात
कापड निर्यातीमध्ये कपडे, विविध कापड यांचा समावेश असणार आहे. सध्याला 1.9 अब्ज डॉलर्सच्या कापडाची युकेला निर्यात होत आहे. ती पुढील तीन वर्षांमध्ये 3 अब्ज डॉलर्सच्या उलाढालीची होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
वाहन निर्यातीत संधी
याचप्रमाणे भारतीय ऑटो क्षेत्रालाही ब्रिटनची निर्यात वाढवण्याची संधी प्राप्त होणार आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा आणि महिंद्रा व टाटा मोटर्स या दिग्गज ऑटोमोबाइल कंपन्यांना सुवर्ण संधी प्राप्त करता येणार आहे. त्यांना आपल्या इलेक्ट्रीक पॅसेंजर वाहनांची निर्यात मुक्त करारानंतर ब्रिटनला करता येईल. करारानंतर ब्रिटनमधील इलेक्ट्रीक, हायब्रिड/हायड्रोजन पॅसेंजर कार गटात भारतीय कंपन्यांना प्रवेश मिळणार आहे. मारुती सुझुकीने भारत सरकारच्या ब्रिटनसोबतच्या मुक्त व्यापार कराराचे स्वागत केले आहे. कंपनीने यापूर्वी युरोपला 36 हजार इ -विटारा कार्सची निर्यात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी लाँच केल्याच्या 9 महिन्यातच वरीलप्रमाणे संख्येने कारची निर्यात केल्याचा विशेष अभिमान असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. आता ब्रिटन हा देश आमच्यासाठी इलेक्ट्रीक कार्सच्या निर्यातीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. करारातील अटींचा अभ्यास करुन निर्यातीची आखणी केली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
खबरदारी घ्यावी लागणार
ब्रिटीश नियमावलीप्रमाणे भारताला पुढील काळात आपली उत्पादने तितकीच आंतरराष्ट्रीय बाजारात खरी उतरतील अशी दर्जेदार बनवावी लागणार आहेत, असे तज्ञांनी मत स्पष्ट केले आहे. निर्यातदारांनी आपल्या उत्पादनांमध्ये सुधारणा व दर्जा उत्तम राखणे आवश्यक असेल. भारत सरकारनेसुद्धा भारत युके मुक्त व्यापाराची सविस्तर माहिती देशांतर्गत उद्योगांपर्यंत पोहचवणे आवश्यक असल्याचे मत तज्ञांनी मांडले आहे.