For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताची आतषबाजी

06:58 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताची आतषबाजी
Advertisement

श्रेयस अय्यर, केएल राहुल यांची शतके, रोहित-गिल-कोहली यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या प्राथमिक फेरीतील शेवटच्या सामन्यात यजमान भारताने दीपावलीच्या पहिल्याच दिवशी चिन्नास्वामी स्टेडियमवर फटक्यांची आतषबाजी केली. या सामन्यात भारताने 50 षटकात 4 बाद 410 धावा जमवित नेदरलँड्सला विजयासाठी मोठे आव्हान दिले. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी दमदार शतके झळकाविताना चौथ्या गड्यासाठी 208 धावांची द्विशतकी भागिदारी केली. त्याचप्रमाणे कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकवली.

Advertisement

 

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यानी पहिल्या षटकापासूनच फटकेबाजी सुरू केली. पहिल्या पॉवरप्लेच्या 10 षटकात भारताने 91 धावा झोडपल्या. चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर चेंडू बऱ्यापैकी उसळत असल्याने गिलने लेगसाईडच्या दिशेने पूलच्या फटक्यावर अधिक भर दिला होता. 24 वर्षीय गिलने लोगन व्हान बीक आणि आर्यन दत्त यांच्या षटकामध्ये प्रत्येकी 1 षटकार खेचला. दत्तच्या गोलंदाजीवर गिलने मिडविकेटच्या दिशेने दुसऱ्या क्रमांकाचा उत्तुंग षटकार नोंदविला. मात्र कर्णधार रोहितला चेंडूवर नजर बसण्यासाठी काही वेळ वाट पहावी लागली. व्हान बीकच्या गोलंदाजीवर रोहित दोनवेळा बाद होताना थोडक्यात वाचला. पण त्यानंतर त्याने नेदरलँड्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. या सलामीच्या जोडीने डीपमिडविकेटच्या दिशेने झेल देत आपल्या विकेट्स गमाविल्या. या जोडीने अर्धशतकी भागिदारी 36 चेंडूत केली. गिलने आपले अर्धशतक 30 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने झळकवले. 12 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मीकेरेनने गिलला झेलबाद केले. त्याने 32 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 51 धावा तडकावल्या. शर्माने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. बास डी लीडेने शर्माला बॅरेसीकरवी झेलबाद केले. त्याने 54 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 61 धावा जमाविल्या. गिल आणि शर्मा यांनी पहिल्या गड्यासाठी 100 धावांची भागिदारी 70 चेंडूत झळकवली.

 

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 71 धावांची भागिदारी 11 षटकात नोंदविली. या जोडीने अर्धशतकी भागिदारी 47 चेंडूत पूर्ण केली. भारताच्या 150 धावा 129 चेंडूत नोंदविल्या गेल्या. तर कोहलीचे अर्धशतक 53 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकले. भारताच्या 200 धावा 171 चेंडूत फलकावर लागल्या. या सामन्यात कोहली वनडे क्रिकेटमधील आपले 50 वे शतक नोंदविल असे वाटत असताना नेदरलँड्सच्या व्हान डर मेर्वेने कोहलीचा त्रिफळा उडविला. त्याने 56 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावा जमाविल्या.

द्विशतकी भागिदारी

कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या जोडीने चौथ्या गड्यासाठी 208 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला भक्कम स्थितीत नेले. या स्पर्धेत 400 धावांचा टप्पा ओलांडणारा भारत हा तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांनीही 400 धावांचा टप्पा गाठला होता. नवोदित क्रिकेटपटूंना अय्यरच्या या फलंदाजीचे तंत्र मार्गदर्शक ठरणारे आहे.

अय्यर आणि राहुल यांनी शतकी भागिदारी 78 चेंडूत झळकवली. राहुलचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर अय्यरने आपले शतक 84 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने झळकवले. अय्यरचे हे वनडे क्रिकेटमधील चौथे तर विश्वचषक स्पर्धेतील पहिले शतक आहे. त्यानंतर केएल राहुलने मीकेरेन आणि व्हा बीक यांच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटके मारले. राहुलने लाँगऑन आणि कव्हरच्या दिशेने 80 मी. पेक्षा अधिक लांबीचे षटकार खेचले. डी लीडेच्या गोलंदाजीवर त्याने सलग दोन षटकार ठोकून शतक झळकवले. वनडे क्रिकेटमधील त्याचे हे सातवे शतक आहे. अय्यरने अर्धशतक 48 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. भारताच्या 250 धावा 214 चेंडूत नोंदविल्या गेल्या. अय्यर आणि राहुल यांनी अर्धशतकी भागिदारी 42 चेंडूत तर शतकी भागिदारी 78 चेंडूत नोंदविली. भारताच्या 300 धावा 250 चेंडूत फलकावर लागल्या. केएल राहुलने आपले अर्धशतक 40 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. राहुलने हे शतक 62 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जलद शतक झळकवणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. अय्यर आणि राहुल यांनी द्विशतकी भागिदारी 125 चेंडूत पूर्ण केली. त्यामध्ये अय्यरचा वाटा 96 तर राहुलचा 101 धावांचा आहे. भारताच्या डावातील शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर राहुल डी लीडेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 64 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 102 धावा झळकवल्या. अय्यरने 94 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 128 धावा झोडपल्या. यादव 2 धावावर नाबाद राहिला. भारताला अवांतरच्या रूपात 15 धावा मिळाल्या. त्यामध्ये 13 वाईड आणि 1 नो बॉलचा समावेश आहे. भारताच्या डावामध्ये 16 षटकार आणि 37 चौकार नोंदविले गेले.

संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकात 4 बाद 410 (रोहित शर्मा 54 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 61, गिल 32 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 51, कोहली 56 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 51, श्रेयस अय्यर 94 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 128, केएल राहुल 64 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 102, यादव नाबाद 2, अवांतर 15, डी लीडे 2-82, व्हान डर मेर्वे 1-53, मीकेरेन 1-90).

Advertisement
Tags :

.