विश्वचषक हॉकीत भारत आठव्या स्थानी
पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमची भारतावर 4-3 अशी मात
वृत्तसंस्था, वेव्हरे (बेल्जियम)
2026 मधील आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या सातव्या आणि आठव्या स्थानासाठीच्या सामन्यात सहयजमान बेल्जियमने भारतीय संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. या पराभवामुळे भारतीय पुरुष संघाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
जागतिक हॉकी मानांकनात दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमने या सामन्यात शेवटच्या मिनिटापर्यंत भारतावर 3-2 अशी आघाडी मिळवली होती. दरम्यान सामना संपण्यास केवळ 26 सेकंद बाकी असताना भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगने या संधीचा फायदा घेत भारताला 3-3 अशी बरोबरी साधून दिल्याने हा सामना निर्धारित कालावधीत 3-3 असा बरोबरीत राहिला. त्यामुळे पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. या स्पर्धेतील हरमनप्रीत सिंगचा हा आठवा गोल होता.
पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतातर्फे शिलानंद लाक्रा, दिलप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी गोल केले. तर हरमनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांचे फटके बेल्जियमच्या गोलरक्षकांनी थोपविल्याने भारताला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. बेल्जियमतर्फे टॉम बून, आर्थर स्लोव्हेर, अॅलेक्सझांडेर हेंड्रीक्स आणि रोमन डुवेकॉट यांनी गोल केले. तर व्हिक्टर फोरबर्टचा फटका वाया गेला. या स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाने यापूर्वी आपले सर्व सामने नेदरलँड्समध्ये खेळले होते. तर सातव्या आणि आठव्या स्थानासाठीचा सामना बेल्जियममध्ये खेळविला गेल्याने साहजिकच यजमान संघाला समर्थकांचा अधिक पाठिंबा मिळाला.
सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर 6 व्या मिनिटाला भारताचे खाते अभिषेकने 6 व्या मिनिटाला उघडले. या सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रात भारताने बेल्जियमवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. 22 व्या मिनिटाला डुवेकोटने बेल्जियमला बरोबरी साधून देताना मैदानी गोल केला. 23 व्या मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या लेबोचेरीने दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत बेल्जियमने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळवली होती. 31 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीत सिंगने आपल्या संघाचा दुसरा गोल करुन बरोबरी केली. 35 व्या मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हेंड्रीक्सने या कॉर्नरवर गोल केला. पण पंचांनी तो नियमबाह्य ठरविला. 40 व्या मिनिटाला भारताला आघडी घेण्याची संधी लाभली होती. पण हरमनप्रीत सिंगचा फटका गोलपोस्टच्या बाहेरुन गेला. 47 व्या मिनिटाला केरपलच्या मैदानी गोलावर बेल्जियमने 3-2 अशी आघाडी मिळवली. सामना संपण्यास केवळ 26 सेकंद बाकी असताना भारताला पंचाने पेनल्टी कॉर्नर बहाल केला आणि हरमनप्रीत सिंगने गोल करुन बरोबरी साधली. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमने भारताला नमविले. तब्बल 51 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघ यावेळी विश्वचषक हॉकी स्पर्धेत किमान पदक मिळवेल असे वाटत होते. पण त्यांचे हे स्वप्न संपुष्टात आले. या स्पर्धेत भारताने पहिल्या फेरीतील सामन्यात वेल्सचा 3-1 तर त्यानंतर पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. पण इंग्लंडने पहिल्या फेरीतील लढतीत भारतावर 4-2 अशी मात केली. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये भारतीय संघाला एकही गुण मिळाला नाही. नेदरलँड्सने भारताचा 3-1 तसेच त्यानंतरच्या झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारताचा 5-3 असा पराभव केल्याने भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र अर्जेंटिनाने भारताचा पराभव करुन या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.