सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारत उपविजेता
वृत्तसंस्था, माले (मालविस)
येथे सुरू असलेल्या 20 वर्षांखालील वयोगटातील पुरूषांच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील झालेल्या अटितटीच्या अंतिम सामन्यात बांगलादेश फुटबॉल संघाने भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव करत विजेतेपद पटकाविले.
येथील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या अटितटीच्या अंतिम सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाल्याने गोलकोंडी कायम राहिली. त्यामुळे पंचांनी अखेर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतातर्फे मोहम्मद अरबाश, सॅमसन आणि विशाल यादव यांनी गोल केले तर रिशीसिंगचा फटका बांगलादेशच्या गोलरक्षकाने थोपविला. बांगलादेशतर्फे मोहम्मद मुरसदअली, चंदन रॉय, मोहम्मद युसुफ अली यांनी गोल केले. अखेर रोनन सलीवानने बांगलादेशचा चौथा आणि निर्णायक गोल नोंदवून आपल्या संघाला सॅफ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेत ओमांग डोडूम याची सर्वात महत्त्वाचा फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. त्याने या स्पर्धेत तीन गोल नोंदविले.