भारताचा ‘जनरल इलेक्ट्रिक’ला दंड इशारा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या स्वदेशनिर्मिती ‘एमके 1 ए’ या हलक्या युद्ध विमानांना वेळेवर इंजिनांचा पुरवठा न केल्याने भारताने अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीला दंडाचा इशारा दिला आहे. इंजिने वेळेवर न पुरविल्यास दंड करण्यात येईल, अशी तरतूद या कंपनीशी केलेल्या करारात आहे. या तरतुदीचा उपयोग केला जाईल, असे भारताने स्पष्ट केले आहे. मात्र, हा मुद्दा गंभीर नसून राजकीय पातळीवर सोडविला जाईल, असे मत अनेक सामरिक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सध्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीकडे या विमानांसाठी उपयुक्त ठरणारी दोन इंजिने उपलब्ध आहेत. ही इंजिने भारताला देण्यात येणार आहेत. हा व्यवहार या आर्थिक वर्षात पूर्ण केला जाणार आहे. कंपनीने हेतुपुरस्सर विलंब लावलेला नाही, असे प्रतिपादन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले असून कराराप्रमाणे इंजिनांचा पुरवठा केले जाणार आहे. काही कारणांमुळे हा विलंब झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून निर्मिती
स्वदेशी ‘एम के 1 ए’ या युद्धविमानाची निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने केली आहे. भारताच्या संरक्षण विभागाने या कंपनीशी 2021 मध्ये 48 हजार रुपयांचा करार केलेला आहे. या करारानुसार ही कंपनी भारताच्या वायुदलाला अशा 83 विमानांचा पुरवठा करणार आहे. या करारानंतर ऑगस्ट 2021 मध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्सने अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीशी इंजिने पुरविण्याचा करार केला. कारण युद्ध विमानांना अत्याधुनिक इंजिनाची आवश्यकता असते. त्या पातळीचे तंत्रज्ञान अद्याप भारतात विकसीत झालेले नाही. जनरल इलेक्ट्रिकने ‘एफ 404 आयएन 20’ या जातीची इंजिने पुरविण्याचे मान्य केले आहे. हा करार 71.6 कोटी डॉलर्सचा आहे.
एकंदर 180 विमानांचा करार
भारताच्या संरक्षण विभागाने हिंदुस्थान एरोनॉटिक्सशी एकंदर एम के 1 ए प्रकारच्या 180 विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. याशिवाय संरक्षण विभाग एम के 1 या प्रकारच्या 220 युद्ध विमानांची खरेदीही या कंपनीकडून टप्प्याटप्प्याने करीत आहे. एम के 1 ए ही विमाने अधिक आधुनिक आहेत. या 180 विमानांसाठी एकंदर 1 लाख 15 हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. भारत आपली जुनी मिग विमाने निवृत्त करत असून त्यांचे स्थान या विमानांना दिले जात आहे. तथापि, इंजिने पुरविण्यास विलंब होत असल्याने हिंदुस्थान एरोनॉटिक्सला समयबद्ध पद्धतीने विमान पुरवठा करणे अवघड जात आहे, अशी माहिती ही कंपनी आणि केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे.
प्रसंग गंभीर नाही
जनरल इलेक्ट्रिक कंपनीकडून इंजिनांच्या पुरवठ्याला होत असलेला विलंब हा हेतुपुरस्सर नाही. तसेच त्या कोणतेही राजकारण अंतर्भूत नाही. सध्या जगात सर्वत्रच विमानपुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले आहेत. अत्याधुनिक विमानांसाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक साधने, सेमीकंडक्टर्स आणि इतर अत्याधुनिक सुटे भाग यांची काही प्रमाणात टंचाई जाणवत असल्याने पुरवठ्याला विलंब होत आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण दूर होताच पुरवठा सुरळीत होईल, असे स्पष्टीकरण जनरल इलेक्ट्रिकच्या व्यवस्थापनाने भारताला दिले आहे. त्यामुळे भारताने केवळ दंडाच्या तरतूद लागू करण्याचा इशारा दिला असून प्रत्यक्ष दंड लागू करण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली आहे.
‘तेजस’ श्रेणीतील विमाने
एम के 1 आणि एम के 1 ए या दोन्ही प्रकारच्या युद्ध विमानांचा समावेश ‘तेजस विमानश्रेणी’त आहे. एम के 1 आणि एम के 1 ए ही तांत्रिक नावे असून ही विमाने भारतात तेजस या नावानेच ओळखली जातात. या विमानांचे इंजिन सोडून सर्व भार भारतात बनतात. यातील शस्त्रेही भारतीय बनावटीची आहेत.