न्यूझीलंडविऊद्धच्या अंतिम सामन्यात भारतासमोर आव्हाने
पाचवा टी-20 : सॅमसनचा फॉर्म, अक्षरच्या फिटनेसची चिंता
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
न्यूझीलंडविऊद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यानिशी भारताची टी-20 विश्वचषकाची तयारी पूर्ण होत असताना संजू सॅमसनला आपल्या खेळाला नवी उभारी देण्यासाठी घरच्या मैदानावरच्या समर्थनाची अपेक्षा असेल, तर दुसरीकडे अक्षर पटेलच्या फिटनेसमुळे भारतीय संघ चिंतेत आहे.
विशाखापट्टणम येथील चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ प्रयोगांच्या मूडमध्ये होता. त्यांनी अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना न खेळवता पाच प्रमुख गोलंदाजांवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला. ही योजना यशस्वी झाली नाही आणि यजमान संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालामुळे मालिकेच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही, कारण भारताने मालिका आधीच जिंकली आहे. या संपूर्ण मालिकेत दिसल्याप्रमाणे गोलंदाजी विभागात पुन्हा काही बदल होण्याची शक्यता आहे आणि व्यवस्थापन मागील दोन सामन्यांमध्ये विश्रांती दिलेल्या मिस्ट्री स्पिनर वऊण चक्रवर्तीला संधी देऊ शकते. फलंदाजी विभागात फारसे बदल होण्याची शक्यता नाही, परंतु व्यवस्थापनाचे लक्ष सॅमसनवर असेल. एक प्रतिभावान फलंदाज असूनही सॅमसन सध्या खूप दबावाखाली असल्याचे दिसत आहे.

सॅमसन या भागातील एक सुपरस्टार आहे हे बीसीसीआयने संघाच्या आगमनानंतर शेअर केलेल्या एका व्हिडिओमधून स्पष्ट झाले आहे. त्यात कर्णधार सूर्यकुमार यादव विमानतळाच्या बाहेर पडताना ‘चेट्टा’साठी (थोरला भाऊ) गंमतीने वाट मोकळी करताना दिसला. तिथे स्थानिक हिरो आणि त्याच्या सहकाऱ्यांची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते रांगेत उभे होते.
इशान किशन हा सॅमसनसाठी एक महत्त्वाचा पर्यायी खेळाडू आहे आणि तो या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे, परंतु या यष्टीरक्षक फलंदाजाला एका अज्ञात दुखापतीमुळे मागील सामन्यात बाहेर बसावे लागले होते. अष्टपैलू अक्षर पटेलही नागपूरमधील पहिल्या टी-20 सामन्यात बोटाला दुखापत झाल्यापासून खेळलेला नाही. मात्र या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने विशाखापट्टणममधील चौथ्या सामन्यापूर्वी नेटमध्ये काही चेंडू टाकले होते.
वैयक्तिक परिस्थितीपलीकडे संघाला काही उद्दिष्ट्यो साध्य करायची आहेत. आधुनिक क्रिकेटमध्ये सामने किंवा मालिकांमधील कालावधी खूपच कमी असतो आणि भारतीय संघ टी-20 विश्वचषकातील आपला पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत खेळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघ या मालिकेकडे केवळ औपचारिकता म्हणून पाहणार नाही. 4-1 च्या मोठ्या फरकाने मिळवलेला विजय शैली, ताकद आणि खोलीने परिपूर्ण असलेल्या संघाचा आत्मविश्वास आणखी वाढवेल. नेमके हेच न्यूझीलंड संघाला होऊ द्यायचे नाही.
पहिल्या तीन सामन्यांमध्ये न्यूझीलंड भारताच्या आक्रमणासमोर हतबल दिसले, परंतु विशाखापट्टणममध्ये त्यांनी यजमानांच्या प्रमुख फलंदाजांना शांत करण्याचा मार्ग शोधला. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केल्यानंतर शिवम दुबेच्या फटकेबाजीनंतरही पाहुण्या गोलंदाजांना उर्वरित फलंदाजी फळीला रोखण्यात यश आले. आता त्यांना माहित आहे की, हा भारतीय संघ अजिंक्य नाही आणि 3-2 च्या फरकाने मिळवलेला विजय त्यांना आगामी मोठ्या स्पर्धांपूर्वी चांगल्या मानसिक स्थितीत ठेवेल.

येथील ग्रीनफिल्ड स्टेडियमवरील मैदान हे भरपूर धावसंख्या निघणारे राहिलेले आहे. येथील खेळपट्टी पाटा आहे आणि भारताने येथे खेळलेल्या चार टी-20 सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत, ज्यात 2017 मधील न्यूझीलंडविऊद्धच्या एका सामन्याचा समावेश आहे. पण कर्णधार मिचेल सँटनरने म्हटल्याप्रमाणे न्यूझीलंडला आता भारताला हरवण्यासाठी काय करावे लागते हे माहित आहे आणि यामुळे एक रोमांचक सामना अपेक्षित आहे. सलामीवीर टिम सेफर्टच्या समावेशामुळे न्यूझीलंडच्या अव्वल फळीला लक्षणीय ताकद मिळालेली आहे. ते गोलंदाजांच्या कामगिरीतही सुधारणा होण्याची आशा बाळगून असतील. त्यासाठी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला संघात आणले जाऊ शकते. परंतु हे त्याच्या तंदुऊस्तीवर अवलंबून आहे.
संघ : भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वऊण चक्रवर्ती, ईशान किशन, रवी बिश्नोई.
न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, झॅक फॉक्स, मॅट हेन्री, काईल जेमिसन, बेव्हन जेकब्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.