For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतासमोर आज अर्जेंटिनाचे आव्हान, उपांत्य फेरीच्या आशा धूसर

05:02 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतासमोर आज अर्जेंटिनाचे आव्हान  उपांत्य फेरीच्या आशा धूसर
Advertisement

वृत्तसंस्था, अॅमस्टेलवीन, नेदरलँड्स : येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या आशा अनेक अटींवर अवलंबून आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात अर्जेंटिनावर मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी भारताला जवळपास निर्दोष कामगिरी करावी लागेल.

Advertisement

नेदरलँड्सविऊद्धच्या 1-3 अशा पराभवामुळे भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर होता, परंतु शनिवारी अर्जेंटिनाने इंग्लंडवर मिळवलेल्या विजयामुळे भारताच्या आशा धूसर का होईना, जिवंत राहिल्या आहेत. भारताचे भवितव्य नेदरलँड्स आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या निकालावरही अवलंबून असेल. हा सामनाही सोमवारीच, पण भारत-अर्जेंटिना सामन्यानंतर खेळवला जाईल. भारताला उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळण्यासाठी नेदरलँड्सला इंग्लंडचा पराभव करावा लागेल. जर इंग्लंडने नेदरलँड्सविऊद्ध सामना बरोबरीत सोडवला किंवा विजय मिळवला, तर अर्जेंटिनावर विजय मिळवूनही भारत स्पर्धेतून बाहेर पडेल.

विश्वचषकाच्या नवीन स्वरूपानुसार, ‘गट ई’मधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. नेदरलँड्सने सहा गुणांसह अंतिम चारमधील आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. दोन सामन्यांनंतर इंग्लंड आणि अर्जेंटिना प्रत्येकी तीन गुणांसह बरोबरीवर आहेत, तर भारताने दुसऱ्या टप्प्यात अद्याप खाते उघडलेले नाही. तरीही आणि जरी संधी खूप कमी असली, तरी तांत्रिकदृष्ट्या भारत अजूनही शर्यतीत आहे, भारतासाठी सर्वांत सोपा मार्ग म्हणजे अर्जेंटिनावर किमान दोन गोलच्या फरकाने विजय मिळवणे आणि इंग्लंडचा नेदरलँड्सकडून किमान तीन गोलांच्या फरकाने पराभव होण्याची आशा करणे.

Advertisement

अर्जेंटिनावर विजय मिळवल्यास भारताचे तीन गुण होतील आणि जर संघांचे गुण समान झाले, तर विजयाचा फरक निर्णायक ठरू शकतो. उदाहरणार्थ, जर भारताने अर्जेंटिनावर 3-1 असा विजय मिळवला, तर त्यांनी केलेले एकूण गोल 6 आणि स्वीकारलेले गोल 8 होतील. अशा परिस्थितीत, जर इंग्लंडचा 0-2 असा पराभव झाला, तर त्यांचे एकूण गोल 5 आणि स्वीकारलेले गोल 7 असतील. अशा वेळी अधिक गोल केल्याच्या आधारावर भारत पुढील फेरीत प्रवेश करेल.

मात्र हे सोपे नाही. अर्जेंटिनाने या स्पर्धेत आपली आक्रमक क्षमता आधीच सिद्ध केली आहे आणि शनिवारी इंग्लंडवर मिळवलेल्या 3-1 विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल. या वर्षाच्या सुऊवातीला रुरकेला येथे झालेल्या एफआयएच प्रो लीगमध्येही त्यांनी भारताचा 8-0 आणि 4-2 असा पराभव केला होता.

Advertisement
Tags :

.