भारताकडून हसीनांच्या व्हिसाला कालावधीवाढ
बांगलादेशच्या युनूस सरकारकडून पासपोर्ट रद्द
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, ढाका
बांगलादेशच्या पदच्युत नेत्या शेख हसीना यांच्या व्हिसाला भारताने कालावधीवाढ दिली आहे. भारताने त्यांचे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी बांगलादेशने केली असताना भारताने घेतलेला हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. याचदरम्यान शेख हसीना यांच्यावर सुरू असलेल्या गुन्हेगारी खटल्यांबाबत युनूस सरकारने प्रथम तिच्यासाठी अटक वॉरंट जारी केले आणि आता तिचा पासपोर्ट रद्द केला आहे. बांगलादेशमध्ये बंडाळी माजल्यापासून शेख हसीना या भारतात वास्तव्यास आहेत.
बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत भारत आणि बांगलादेशमध्ये तणाव वाढत आहे. बांगलादेशचे अंतरिम सरकार शेख हसीनाच्या भारताकडे प्रत्यार्पणाची मागणी करत आहे आणि हसीनाला तुरुंगात टाकण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरत आहे. ऑगस्ट 5 पासून त्या भारतात आहेत. 77 वर्षांच्या हसीना यांना भारताने अद्याप अधिकृत राजाश्रय दिलेला नाही. तथापि, त्यांचे वास्तव्य भारतात आहे. बांगलादेशमध्ये त्यांच्या विरोधात बंड झाल्यानंतर त्या भारतात आल्या आहेत. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले आहे.