भारत-इंग्लंड महिलांची आज उपांत्य लढत
वृत्तसंस्था/कौलालंपूर
येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे भारत आणि इंग्लंड युवा महिला संघामध्ये चुरशीचा उपांत्य सामना खेळविला जाणार आहे. भारतीय युवा महिला संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा महिला संघाने या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासूनच आपल्या कामगिरीत सातत्य राखत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने यजमान मलेशियाचा 10 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली.
त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने लंकेचा 60 धावांनी पराभव केला. सुपर सिक्स फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 8 गड्यांनी पराभव केला. या फेरीतील पुढील सामन्यात भारताने स्कॉटलंडवर 150 धावांनी विजय मिळवित उपांत्यफेरी गाठली. भारतीय संघातील सलामीची फलंदाज त्रिशा गोंगाडी हिची फलंदाजी चांगलीच बहरत आहे. तिने या स्पर्धेत शानदार शतक झळकविले. त्रिशाने 59 चेंडूत 110 धावा झोडपल्या होत्या. तसेच अन्य सामन्यात 4, नाबाद 27, 49, 40 अशा धावा केल्या आहेत. त्रिशाने या स्पर्धेत आतापर्यंत 5 सामन्यांत 76.66 धावांच्या सरासरीने सर्वाधिक म्हणजे 230 धावा जमविल्या आहेत.
त्रिशाने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली असून तिला वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्लाची चांगली साथ मिळत आहे. या स्पर्धेत इंग्लंड संघाची कामगिरीही समाधानकारक झाली असली तरी भारताच्या आक्रमक फलंदाजीला रोखण्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजांची सत्वपरिक्षा ठरेल. इंग्लंडच्या युवा महिला संघाने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारताना दोन सामने जिंकले असून 2 सामने गमविले आहेत. इंग्लंड संघाचे नेतृत्व अॅबी नोरग्रोव्हकडे सोपविण्यात आले आहे. या सामन्याला शुक्रवारी दुपारी 12 वाजता प्रारंभ होईल.