For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-इंग्लंड दुसरी कसोटी लढत आजपासून

06:58 AM Jul 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत इंग्लंड दुसरी कसोटी लढत आजपासून
Advertisement

एक फिरकी गोलंदाज खेळवायचा की दोन ? : पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या भारतासमोर संघरचनेचा प्रश्न

Advertisement

वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम

भारताला त्यांचा संघ निवडीविषयीचा रूढीवादी दृष्टिकोन सोडून आज बुधवारपासून येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविऊद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 20 बळी घेण्याची सर्वोत्तम संधी मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. संघ व्यवस्थापनाच्या स्वत:च्या कबुलीनुसार लीड्समध्ये भारताला कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजाची उणीव भासली. कारण इंग्लंडने पाचव्या दिवशी आरामात 371 धावांचा पाठलाग केला. सदर सामना खरे तर पाहुण्या संघाने जिंकायला हवा होता.

Advertisement

साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डुशेट यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास भारत अशा संघरचनेच्या शोधात आहे जी फलंदाजीच्या खोलीशी तडजोड करणार नाही व तरीही 20 बळी घेण्याच्या दृष्टीने पुरेसे गोलंदाज उपलब्ध करेल. ‘रणनीतीचे व्यवस्थापन करताना आम्ही प्रत्येक गोलंदाजाकडे वैयक्तिकरीत्या पाहत आहोत. आम्हाला वाटते की, ते बळी घेऊ शकतात. आम्ही फक्त संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहोत. 20 बळी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे संघाला नक्कीच अशा खेळाडूंचा विचार करावा लागत आहे जे बळी घेऊ शकतात’, असे डुशेट यांनी सांगितले.

बर्मिंगहॅममध्ये हवामान खूपच उष्ण आहे आणि गवताच्या चांगल्या आच्छादनाखालील खेळपट्टी कोरडी आहे. तीन वर्षांपूर्वी याच मैदानावर इंग्लंडने 378 धावा काढून मालिका बरोबरीत आणली होती. अलीकडच्या काळात याच खेळपट्टीने काउंटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना भरपूर धावा काढू दिल्या आहेत. मात्र फिरकीपटू उतरतील तेव्हा परिस्थिती कशी राहील हे पाहावे लागेल आणि भारताला हे ठरवावे लागेल की, त्यांना रवींद्र जडेजाला मदत करू शकणारा वॉशिंग्टन सुंदरसारखा कोणीतरी हवा आहे की, बळी मिळविण्याच्या बाबतीत खूप चांगला पर्याय असलेला कुलदीप हवा आहे.

भारत दोन फिरकीपटूंसह खेळेल हे निश्चित आहे. शार्दुल ठाकुर लीड्समध्ये वेगवान गोलंदाज करणारा अष्टपैलू म्हणून खेळला होता. परंतु यावेळी अष्टपैलू नितीश रे•ाr खेळेल अशी दाट शक्यता आहे. ठाकुरकडून सर्वोत्तम कामगिरी घडलेली नसली, तरी केवळ एका संधीनंतर त्याला वगळणेही कठोर ठरेल. सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहे. तो तीन कसोटी सामने खेळेल असे सांगण्यात आलेले आहे. दुसरा कसोटी सामना तो खेळला नाही, तर वेगवान गोलंदाजांच्या विभागात मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश राहण्याची शक्यता आहे.

एका बाजूने बुमराहला हाताळणे कठीण असताना दुसरीकडे, इंग्लंडच्या फलंदाजांना आव्हान देण्याच्या दृष्टीने अचूक मारा करणे व आवश्यक सातत्य दाखविणे इतर गोलंदाजांना शक्य झाले नव्हते. त्या अनुभवानंतर ते अधिक शहाणे होतील अशी अपेक्षा असून जर बुमराह खेळला नाही, तर त्यांना बरेच काही सिद्ध करावे लागेल. हेडिंग्ले येथे पाचव्या दिवशी फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर फारसे काही साध्य करता आलेले नसले, तरी जडेजा देखील प्रभाव पाडण्यास उत्सुक असेल.

लीड्समधील भयानक कामगिरीनंतर भारताचे क्षेत्ररक्षण खूपच चांगले असावे लागेल. पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वालला स्लिपमध्ये उभे राहणे महागात पडले होते. फलंदाजी विभाग स्थिर वाटत असला, तरी दोन वेळा खालची फळी कोसळणे महागात पडल्यानतंर भारत डावाच्या अखेरीस धावा जोडण्यास उत्सुक असेल. के. एल. राहुल, जैस्वाल, रिषभ पंत आणि कर्णधार शुभमन गिलसारखे खेळाडू मालिकेच्या सलामीच्या सामन्यातील कामगिरीत भर घालण्याचा प्रयत्न करतील. मालिकेच्या निराशाजनक सुऊवातीनंतर नवोदित साई सुदर्शन आणि पुनरागमन करणारा कऊण नायर यांना आणखी एक संधी मिळण्याची खात्री आहे.

दुसरीकडे, इंग्लंडने त्यांच्या बाझबॉल

पद्धतीत बदल करत परिस्थिती आणि गोलंदाजांचा योग्य आदर करण्याचा दृष्टिकोन दाखविलेला आहे. आर्चर या सामन्यातून पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्याने कौटुंबिक कारणामुळे या सामन्यातून माघार घेतली आहे. ख्रिस वोक्सच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजी विभाग आत्मविश्वासाने भरलेला असेल. कारण त्यांनी दोनदा भारताच्या शेपटाला साफ केले आणि यजमानांना पुनरागमन करण्याची संधी दिली. लीड्समध्ये फारशी चमक दाखविता न आल्यानंतर स्थानिक हिरो असलेला वोक्स नवीन चेंडूवर बळी मिळविण्याची अपेक्षा असेल. जोश टँग भारताच्या तळाच्या फळीला कापून टाकण्यास उत्सुक असेल. ब्रायडन कार्समध्येही सुधारणा झाली असून कर्णधार स्टोक्सने आतापर्यंत परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा घेतला आहे. चांगल्या खेळपट्टीची इंग्लंडच्या फलंदाजीच्या आक्रमक शैलीला मदत झाली आहे.

Advertisement
Tags :

.