भारत-इंग्लंड आज शेवटचा टी-20 सामना
वृत्तसंस्था / मुंबई
येथील वानखेडे स्टेडियमवर रविवारी यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्याला सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होत आहे. भारताने शुक्रवारी पुणे येथील चौथा सामना जिंकून मालिका सिलबंद केल्याने आता रविवारचा सामना केवळ औपचारिकता म्हणून राहिल. मात्र या सामन्यात सॅमसन आणि कर्णधार सुर्यकुमार यादव यांना फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडावे लागेल.
या मालिकेत भारताने पहिले सलग दोन सामने जिंकल्यानंतर इंग्लंडने तिसरा सामना जिंकून रंगत आणली. पण पुण्याच्या चौथ्या सामन्यात इंग्लंड संघाने दर्जेदार कामगिरी केली. पण त्यांना मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. भारताची फलंदाजी सुरुवातीला कोलमडल्यानंतर हार्दीक पांड्या आणि शिवम दुबे यांनी दमदार अर्धशतके झळकविल्याने भारताला 180 धावांपर्यंत मजल मारताआली. मात्र इंग्लंडने आपल्या डावाला दमदार सुरुवात करताना 7 षटकाअखेर 1 बाद 65 धावांपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर त्यांना भारताच्या गोलंदाजीसमोर आपले आव्हान टिकविता आले नाही. कर्णधार सुर्यकुमार यादवला या मालिकेत फलंदाजीत अधिक धावा जमविता आलेल्या नाहीत. दोन सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. तर दोन सामन्यात त्याने अनुक्रमे 12 आणि 14 धावा जमविल्या आहेत. यादव प्रमाणेच सॅमसनची स्थिती फारशी वेगळी नाही. संजू सॅमसनने या मालिकेतील चार सामन्यात आतापर्यंत 35 धावा जमविल्या असल्याने रविवारच्या सामन्यात तो अधिक धावा जमविण्यासाठी प्रयत्न करेल.
अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, बिस्नॉई आणि अष्टपैलु अक्षर पटेल यांच्यावर भारतीय गोलंदाजीची मदार राहिल. हार्दीक पांड्या उपयुक्त गोलंदाजी करु शकतो. शमीच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहिल. मात्र इंग्लंड संघाला ही मालिका जिंकता आलेली नसली तरी पुढील वनडे मालिकेसाठी त्यांच्याकडून दर्जेदार कामगिरी अपेक्षित आहे. बेथेल आणि स्मिथ हे इंग्लंड संघातील खेळाडू भारतीय संघासमोर चाचपडत खेळत असल्याचे जाणवते. रविवारच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा राहिल. भारतीय संघ या सामन्यात आणखी एक विजय मिळवून आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारत संघ: सुर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दीक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, बिस्नॉई, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, ध्रुव ज्युरेल, रिंकू सिंग, शिवम दुबे, रमनदीप सिंग, हर्शित राणा.
इंग्लंड: बटलर (कर्णधार), सॉल्ट, डकेट, ब्रुक, लिव्हिंगस्टोन, स्मिथ, आदील रशीद, कार्से, ओव्हरटन, अॅटकिनसन, रेहान अहम्मद, आर्चर, मार्क वूड, बेथेल व शकीब मेहम्मुद
वेळ सायंकाळी 7 वाजता