विश्व पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारताचे वर्चस्व
पायल नागला सुवर्ण,भारताला एकूण 16 पदके
वृत्तसंस्था, बँकॉक
येथे झालेल्या विश्व पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या तिरंदाजपटूंनी आपले निर्विवाद वर्चस्व राखले. या स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी 7 सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण 16 पदकांची लयलुट केली. भारताची नवोदित महिला तिरंदाजपटू पायल नागने आपल्याच देशाच्या शितल देवीचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
या स्पर्धेत भारताच्या तोमन कुमार आणि भावना यांनी अनुक्रमे पुरूषांच्या कंपाऊंड आणि महिलांच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदके मिळविले. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात पॅरा ऑलिम्पिक पदक विजेत्या हरविंदर सिंग आणि स्वाती चौधरी यांनी रौप्यपदके मिळविली. पुरूषांच्या कंपाऊंड वैयक्तिक तिरंदाजी प्रकारात भारताच्या शामसुंदर स्वामीने आपल्याच देशाच्या राकेशकुमारवर विजय मिळवित कांस्यपदक मिळविले.
महिलांच्या तिरंदाजी प्रकारात पायल नागने भारताच्या टॉपसिडेड शितल देवीचा कंपाऊंड वैयक्तिक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत 139-136 अशा तीन गुणांच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. पायल नागचा शितल देवी वरील हा गेल्या वर्षभराच्या कालावधीतील दुसरा विजय आहे. पायल नागची ही दुसरी आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा आहे. 2025 मध्ये दुबईत झालेल्या आशियाई युवा पॅरा स्पर्धेत पायल नागने पहिल्यांदा आपला सहभाग दर्शविला होता.
भारताच्या तोमनकुमारने पुरूषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या जोनाथन मिलेनीचा 146-142 असा पराभव केला. तर महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारताच्या भावनाने थायलंडच्या पेटावेओचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. महिलांच्या रिकर्व्ह वैयक्तिक तिरंदाजी प्रकारातील अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या खोलीदिनने भारताच्या हरविंदर सिंगला 7-3 अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदक मिळविले. हरविंदर सिंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या रिकर्व्ह डब्यू-1 विभागात भारताच्या स्वाती चौधरीला रौप्यपदक मिळाले.