For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकमेव महिला कसोटीत भारताचे वर्चस्व

06:58 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
एकमेव महिला कसोटीत  भारताचे वर्चस्व
Advertisement

दुसरा दिवस : भारताला 157 धावांची आघाडी : स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्माची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

येथील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीत टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेरीस पहिल्या डावात 119 षटकांत 7 बाद 376 धावा केल्या आहेत. डावखुरी स्टार फलंदाज स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज व दीप्ती शर्मा यांनी शानदार अर्धशतके झळकावली. टीम इंडियाकडे आता 157 धावांची आघाडी असून दिवसअखेरीस दीप्ती शर्मा 70 व पूजा वस्त्रकार 33 धावांवर खेळत होत्या. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा पहिला डाव 219 धावांवर आटोपला.

Advertisement

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन महिला फलंदाज जास्त वेळ तग धरू शकल्या नाहीत. 77.4 षटकांचा खेळ झाल्यानंतर त्यांनी 219 धावांवर आपल्या सर्व विकेट्स गमावल्या. यानंतर भारतीय महिलांनी आश्वासक सुरुवात करताना पहिल्या दिवसअखेरीस 1 बाद 98 धावापर्यंत मजल मारली होती. याच धावसंख्येवरुन टीम इंडियाने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली.

स्मृती, दीप्ती, रिचा, जेमिमाची अर्धशतके

पहिल्या सत्रातच स्मृती मानधनाने शानदार अर्धशतकी ख्sाळी साकारली. तिने 12 चौकारासह 74 धावा केल्या. ही जोडी जमलेली असताना स्नेह राणाला 9 धावांवर गार्डनरने बाद केले. पाठोपाठ स्मृतीही धावबाद झाली. यानंतर रिचा घोष व जेमिमा रॉड्रिग्ज यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने एकेरी दुहेरी धावांवर भर देत चौथ्या गड्यासाठी 113 धावांची भागीदारी साकारली. दरम्यान, रिचा घोषने अर्धशतकी खेळी साकारताना 104 चेंडूत 7 चौकारासह 52 धावा केल्या तर जेमिमानेही सुरेख खेळ करताना 121 चेंडूत 9 चौकारासह 73 धावांचे योगदान दिले. या जोडीने ऑस्ट्रेलियन महिलांचा चांगलाच समाचार घेत संघाच्या अडीचशे धावा फलकावर लावल्या. अर्धशतकानंतर मात्र रिचाला किम गर्थने बाद केले.

रिचा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरला भोपळाही फोडता आला नाही. गार्डनरने तिला पायचीत केले. हरमनपाठोपाठ गार्डनरने यास्तिका भाटियाला पायचीत करत भारताला लागोपाठ दोन धक्के दिले.  यानंतर जेमिमा रॉड्रिग्जही 73 धावा काढून बाद झाली. यावेळी टीम इंडियाने 7 बाद 274 धावा केल्या होत्या.

लागोपाठ तीन विकेट गेल्यानंतर दीप्ती शर्मा व पूजा वस्त्रकार यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. दीप्ती व पूजा यांनी आठव्या गड्यासाठी 102 धावांची भागीदारी केली. या जोडीने ऑसी महिला गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दीप्तीने 147 चेंडूत 9 चौकारासह नाबाद 70 धावा फटकावल्या तर पूजाने 4 चौकारासह नाबाद 33 धावा करत तिला चांगली साथ दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने 119 षटकांत 7 बाद 376 धावा केल्या होत्या.

आज सामन्याचा तिसरा दिवस असून भारतीय संघाचा मोठी आघाडी घेण्याकडे कल असेल. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासाठी अॅश्ले गार्डनर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने पहिल्या डावात तब्बल 41 षटके गोलंदाजी केली असून 100 धावा खर्च केल्या आहेत. यानंतर तिला चार महत्वाच्या विकेट्स नावावर करता आल्या.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलियन महिला संघ प.डाव 77.4 षटकांत सर्वबाद 219 (बेथ मुनी 40, ताहलिया मॅकग्रा 50, एलिसा हिली 38, किम गर्थ नाबाद 28, पूजा वस्त्रकार 4 तर स्नेह राणा 3, दीप्ती शर्मा 2 बळी).

भारतीय महिला संघ प.डाव 119 षटकांत 7 बाद 376 (शेफाली वर्मा 40, स्मृती मानधना 74, स्नेह राणा 9, रिचा घोष 52, जेमिमा रॉड्रिग्ज 73,  हरमनप्रीत कौर 0, यास्तिका भाटिया 1, दीप्ती शर्मा खेळत आहे 70, पूजा वस्त्रकार खेळत आहे 33, अॅश्ले गार्डनर 100 धावांत 4 बळी, किम गर्थ व जोनासेन 1 बळी).

Advertisement
Tags :

.