लडाखमधील अवैध कारनामे भारताला मान्य नाहीत!
नवीन काउंटीच्या घोषणेवर भारताचा चीनला कडक संदेश
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीनमधील एलएसीचा मुद्दा नुकताच सोडवला जात असताना चीन सरकारने पुन्हा आपला लोभी चेहरा दाखवला आहे. लडाखच्या काही भागावर चीनने दावा केला आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने चीनला कडक शब्दात फटकारले आहे. लडाखमधील अवैध कारनामे भारताला पूर्णपणे अमान्य असल्याचा कडक संदेश परराष्ट्र मंत्रालयाने चीनला दिला आहे.
गेल्या महिन्यात चीनने होटन प्रांतात हेआन आणि हेकांग या दोन नवीन काउंटीजच्या निर्मितीची घोषणा केली. या काउंटीजमधील काही भाग लडाख या भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहेत. हा भाग भारताचा अविभाज्य भाग असून चीनचा दावा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे भारताने स्पष्टपणे म्हटले आहे. तर दुसरे प्रकरण ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर चीन धरण बांधत असून त्यावर भारताने आक्षेप घेतला आहे.
चीनने लडाखचा भाग असलेल्या होटन प्रांतात दोन नवीन काउंटीची (जिल्हे) घोषणा केल्यामुळे भारताने चीनकडे ‘तीव्र निषेध’ नोंदवला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवार, 3 जानेवारीला प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चीनच्या होटन प्रांतात दोन नवीन काऊंटी स्थापन करण्यासंबंधीची घोषणा आमच्या ऐsकिवात आली आहे. या तथाकथित काउंटींच्या अधिकारक्षेत्रातील काही भाग भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे, असे भारताने स्पष्टपणे सांगितले आहे.
लडाखवर चीनचा अवैध कब्जा भारताने कधीही मान्य केलेला नाही. चीनने नवीन काऊंटी जाहीर केल्याने भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच या भागावर चीनचा बेकायदेशीर आणि बळजबरी कब्जा मान्य केला जाणार नाही. याबाबत आम्ही राजनयिक माध्यमातून तक्रार केली असल्याचेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले. तसेच ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्यावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. चीन तिबेट परिसरात जगातील सर्वात मोठे धरण बांधत आहे. यारलुंग त्सांगपो नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे. ही नदी पुढे ब्रह्मपुत्रा बनते आणि बांगलादेशात तिला जुमना नदी म्हणतात. भारत आणि बांगलादेशातील तज्ञांनीही या धरण प्रकल्पाबाबत अनेक चिंता व्यक्त केल्या होत्या.