‘गोल्डन ग्लोब’ची भारताला हुलकावणी
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
कॅलिफोर्नियामध्ये रविवारी रात्री 82वे गोल्डन ग्लोब पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतातर्फे पायल कपाडियाचा चित्रपट ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट’ला दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. मात्र, हा चित्रपट गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकण्यापासून चुकला. ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉन-इंग्लिश) आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. मात्र, फ्रेंच चित्रपट एमिलिया पेरेझला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान प्राप्त झाला आहे. तसेच दिग्दर्शक ब्रॅडी कॉर्बेट यांना द ब्रुटालिस्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.
82 व्या गोल्डन ग्लोब्स पुरस्कारासाठी सर्वांच्या नजरा पायल कपाडियावर होत्या. पायल यांनी दोन नामांकने मिळवून इतिहास रचला होता. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत नामांकन मिळवणारी ती पहिली भारतीय दिग्दर्शक होती. मात्र विजेतेपद मिळवण्याचे भाग्य तिला लाभू शकले नाही. गोल्डन ग्लोब्स या पुरस्काराने हुलकावणी दिली असली तरी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला होता.