महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जर्मनीकडून भारताचा पराभव

06:50 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न जर्मनीने उदध्वस्त केल्याने पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे. जर्मनीने भारताचा 3-2 अशा गोलफरकाने उपांत्य सामन्यात पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेदरलॅन्ड्सने स्पेनचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता जर्मनी आणि नेदरलॅन्डस् यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. तर कास्य पदकासाठी भारताचा स्पेन बरोबरचा सामना गुरूवारी होणार आहे.

Advertisement

ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल 44 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्याची संधी भारतीय हॉकी संघाला यावेळी मिळाली होती. पण जर्मनीने भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणले. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघाचा खेळ अधिक आक्रमक आणि वेगवान झाला. कर्णधार हरमनप्रित सिंगने 7 व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. दरम्यान भारताला ही आघाडी अधिकवेळ राखता आली नाही. 18 व्या मिनिटाला गोंझालो पिलेटने जर्मनीला बरोबरी साधून दिली. खेळाच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत जर्मनीने 2 गोल केले. 27 व्या मिनिटाला ख्रिस्टोफर रुहरने शानदार गोल करुन जर्मनीला आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत जर्मनीने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. सुखजितसिंगने 36 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल करुन जर्मनीशी बरोबरी साधली. सामना संपण्यास 6 मिनिटे बाकी असेपर्यंत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. 54 व्या मिनिटाला मार्को मिल्टकावने जर्मनीचा तिसरा आणि निर्णायक गोल करुन भारताचे आव्हान संपुष्टात आणले. सामन्यातील 58 व्या मिनिटाला भारतीय गोलरक्षक पी. आर. श्रीजेश मैदानाबाहेर आला आणि त्याच्या जागी दुसरा बदली खेळाडू समशेरसिंग मैदानात आला. यावेळी गोलरक्षकाच्या गैरहजेरीत भारतीय बचावळफळीतील खेळाडूंनी जर्मनीचा संभाव्य गोल थोपविला. शेवटच्या दोन मिनिटांच्या कालावधीत भारताने जर्मनीच्या गोलपोस्ट जवळ चढाया केल्या. पण भारताला नशिबाची साथ लाभली नाही. या सामन्यात भारताला 12 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. त्यापैकी 2 कॉर्नर्सवर गोल नोंदविले गेले. जर्मनीने 7 पेनल्टी कॉर्नरपैकी एका कॉर्नरवर गोल केला. भारताने 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती आणि त्या स्पर्धेत भारताने शेवटचे सुवर्ण पदक मिळविले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article