आगामी पाच वर्षांत भारत ‘डेटा कॅपिटल’
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील 11 वर्षांत डेटाच्या किमतीत 97 टक्क्यांनी घट झाल्याने पुढील पाच वर्षांत भारत जगाची डेटा कॅपिटल (राजधानी) बनण्याच्या तयारीत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारत ही प्रगती साधेल असे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलंय.
भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मोबाईल बाजारपेठ आहे. देशात 1.2 अब्ज मोबाईल वापरकर्ते आणि 97.4 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत, त्यापैकी सुमारे 94 कोटी ब्रॉडबँड वापरकर्ते आहेत असे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, 1 जीबी डेटाची सरासरी किंमत 2014 मध्ये 287 रुपयांच्या तुलनेत 9 रुपये आहे. अशा प्रकारे संवादाचा खर्च 97 टक्क्यांनी कमी झाला आहे. भारतात प्रति जीबी संवादाचा खर्च जागतिक सरासरीच्या 20 टक्के आहे. भारत हा स्वदेशी 4 जी पायाभूत सुविधा बांधणारा जगातील पाचवा देश आहे आणि बीएसएनएलने देशात 94,000 हून अधिक 4 जी टेलिकॉम टॉवर बसवले आहेत. इंडिया पोस्ट हे जगातील सर्वात मोठे वितरण नेटवर्क असून 1.64 लाख केंद्रे आहेत, त्यामुळे पुढील पाच वर्षांत ते नफा मिळवतील.