For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालच्या उपसागरात भारताकडून जीपीएस जॅमिंग परीक्षण

06:55 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
बंगालच्या उपसागरात भारताकडून जीपीएस जॅमिंग परीक्षण
Advertisement

नोटॅम जारी : पाकिस्तानच्या कोलकात्यावरील हल्ल्याच्या धमकीची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्याकडून कोलकाता शहरावर हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भारत आता स्वत:च्या इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतांना मजबूत करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलणार आहे. भारत 11-12 एप्रिल रोजी बंगालच्या उपसागरात दोन दिवसीय ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (जीएनएसएस) जॅमिंग परीक्षण आयोजित करणार आहे. याकरता अनेक विभागांना नोटॅम जारी करण्यात आला आहे.

Advertisement

या परीक्षणाचा उद्देश आधुनिक युद्ध परिस्थितींमध्ये उपग्रह आधारित नेव्हिगेशन सिस्टीमला नुकसान पोहोचविणाऱ्या तंत्रज्ञानांची पडताळणी करणे आहे. हे तंत्रज्ञान जीपीएस समवेत विविध जीएनएसएस नेटवर्कच्या सिग्नल्सना निष्क्रीय करू शकते.

उपग्रह दिशादर्शन रोखण्यावर लक्ष

युद्धासारख्या स्थितीत शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्रांसमवेत अन्य दिशादर्शन संचालित शस्त्रास्त्रांच्या नेव्हिगेशन सिस्टीमला कशाप्रकारे बिघडविता येईल हे परीक्षणात पडताळण्यात येणार आहे. संरक्षण यंत्रणा या अभ्यासादरम्यान अनेक मापदंडांवर नजर ठेवतील, ज्यात सिग्नल व्यत्ययाची मर्यादा, किती अंतरापर्यंत हे जॅमिंग सिस्टीम कार्य करत आहे याची अचूकता तपासली जाणार आहे.

जारी करण्यात आला नोटॅम

याविषयी वायुदलासमवेत अनेक विभागांना नोटॅम जारी करण्यात आला आहे. परंतु हे परीक्षण पूर्णपणे नियंत्रित स्थितीत करण्यात येणार आहे, जेणेकरून क्षेत्रात संचालित नागरी विमानो•ाण आणि सागरी वाहतुकीला कुठलाही धोका होऊ नये.

बंगालच्या उपसागराची निवड का?

भारताच्या सागरी सुरक्षा सुविधा आणि हिंदी महासागर क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण संचालन क्षेत्राच्या नजीक असल्याने परीक्षणासाठी बंगालच्या उपसागराची निवड करण्यात आली आहे. या क्षेत्रात परीक्षण केल्याने हवाई हल्ल्यांच्या वास्तविक अचूकतेबद्दल माहिती मिळू शकणार आहे.

-सिग्नल रोखण्याची सीमा

-इंटरफेरेंसची तीव्रता

-वास्तविक स्थितीत उपकरणांची प्रभावशीलता

जीएनएसएस जॅमिंग तंत्रज्ञानाचा वापर शत्रूच्या प्रिसिजन गायडेड शस्त्र, ड्रोन नेटवर्क आधारित सैन्य प्रणालींना कमकुवत करण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे भारताचे नौदल आणि किनारी सुरक्षा संपत्तींची सुरक्षा मजबूत होणार आहे.

युद्धस्थितीत उपयुक्त

-युद्धसमयी जीपीएस जॅमिंग शत्रूच्या ड्रोनला भटकवू शकते.

-हे प्रिसिजन शस्त्रास्त्रांची अचूकता संपुष्टात आणू शकते.

-जहाज, विमानाच्या दिशादर्शन प्रणालीत बिघाड करू शकते.

-कमांड अन् कंट्रोल सिस्टीममध्ये व्यत्यय निर्माण करण्यास सक्षम.

-जीपीएस जॅमिंग शत्रूवर थेट हल्ला न करता त्याला नुकसान पोहोचविते.

जीपीएस जॅमिंगच्या घटनांमध्ये वाढ

अलिकडच्या वर्षांमध्ये जगातील अनेक संघर्ष क्षेत्रांमध्ये जीपीएस जॅमिंग आणि स्पूफिंगच्या घटना वाढल्या आहेत. हे विचारात घेत भारत इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रज्ञानांमध्ये गुंतवणूक वाढवत आहे, ज्यात व्हीएचएफ-युएचएफ कम्युनिकेशन जॅमर आणि मोबाइल ईडब्ल्यू प्लॅटफॉर्म ‘सम्युक्ता’ यासारखी सिस्टीम सामील आहे.

Advertisement

.