भारत-चीन महिला हॉकी सामना आज
वृत्तसंस्था / बर्लिन (जर्मनी)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2024-25 महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचे दोन सामने चीनबरोबर होत आहेत. यापैकी पहिला सामना शनिवारी तर दुसरा सामना रविवारी खेळविला जाईल.
या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी आतापर्यंत अत्यंत निकृष्ट झाली असून त्यांनी सलग पराभव स्वीकारले आहेत. सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आठव्या स्थानावर असून असून आयर्लंड शेवटच्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे. चीनने चौथे स्थान घेतले आहे. गेल्या आठवड्यात बेल्जियमच्या दौऱ्यामध्ये सलीमा टेटेच्या भारतीय संघाने बलाढ्या बेल्जियमवर विजय मिळविल्याने या संघाचा आत्मविश्वास थोडा वाढला आहे. यापूर्वी चीनबरोबर झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी विजय मिळविला होता. तर 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात बिहार येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक महिलांच्या हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने चीनचा 1-0 असा निसटता पराभव केला होता.