हिंदी महासागरात ‘आमने-सामने’ भारत-चीनच्या युद्धनौका
कोलंबोत पोहोचल्या दोन्ही देशांच्या युद्धनौका
वृत्तसंस्था/ कोलंबो
हिंदी महासागर क्षेत्रात रणनीतिक प्रभावासाठी भारत आणि चीनदरम्यान मोठी चढाओढ सुरू आहे. तर दुसरीकडे दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही तणाव आहे. अशा स्थितीत श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये भारताची युद्धनौका गायडेड-मिसाइल विध्वंसक आयएनएस मुंबईचे डॉकिंग झाले आहे. तर दुसरीकडे चीनच्या तीन युद्धनौका देखील कोलंबो येथे दाखल झाल्या आहेत.
चिनी युद्धनौकांपैकी काही त्याच्या सागरी चाचेगिरी विरोधी दलाचा भाग आहेत. आता हिंदी महासागर क्षेत्रात चिनी युद्धनौका पूर्वीच्या तुलनेत अधिक काळापर्यंत राहत असल्याचे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले आहे. हिंदी महासागर क्षेत्रात चीनची वाढती नौसैनिक उपस्थिती तसेच क्षेत्रात अतिरिक्त लॉजिस्टिक बदल सुविधांची मागणी ही भारतासाठी एक प्रमुख आव्हान ठरले आहे.
140 युद्धनौका असलेल्या भारतीय नौदलाला पाकिस्तानवर नजर ठेवणे आणि हिंदी महासागर क्षेत्रात चीनला रोखण्यासाठी निश्चितपणे पुरेशा दलाची आवश्यकता आता भासणार आहे. भारतीय नौदलाने तीन चिनी युद्धनौका विध्वंसक हेफेई, लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक वुझिशान आणि कियानशान हिंदी महासागर क्षेत्रात प्रवेश करण्यापासून कोलंबोमध्ये डॉकिंगच्या वेळेपर्यंत त्याच्यावर जवळून नजर ठेवली आहे. या युद्धनौकांवर सुमारे 1500 कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक तैनात आहे.
आयएनएस मुंबईचे स्वागत
श्रीलंकेने आयएनएस मुंबईचे स्वागत केले आहे. या युद्धनौकेची धुरा कॅप्टन संदीप कुमार यांच्याकडे असून त्यांच्यासोबत 410 नौसैनिकांचे पथक आहे. तर चिनी युद्धनौकांचेही ‘नौसैनिक परंपरांचे पालन करत’ श्रीलंकेकडून स्वागत करण्यात आले. आयएनएस मुंबई आणि चिनी युद्धनौकांसाठी श्रीलंकन युद्धनौकांसोबत ‘पॅसेज एक्सरसाइज’ वेगवेगळ्या स्वरुपात आयोजित करण्यात येणार आहे. कोलंबोमध्ये चिनी युद्धनौकांच्या डॉकिंगमुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत. भारताने यापूर्वी श्रीलंकेसमोर याप्रकरणी जोरदार आक्षेप नोंदविला होता. त्यावेळी श्रीलंकेने चिनी युद्धनौका, हेरनौका आणि पाणबुड्यांना श्रीलंकेच्या बंदरांवर नांगर टाकण्याची अनुमती दिली होती.
श्रीलंकेत लवकरच निवडणूक
या रणनीतिक चढाओढीदरम्यान आता सर्वांच्या नजरा 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणुकीवर केंद्रीत झाल्या आहेत. वर्तमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासमोर नॅशनल पीपल्स पॉवर पार्टीचे अनुरा कुमार दिसानायके यांचे आव्हान आहे. यात विक्रमसिंघे यांना भारतधार्जिणे मानले जात आहे. तर दिसानायके हे चीनसमर्थक म्हणून ओळखले जातात. 360 हून अधिक युद्धनौका आणि पाणबुड्यांसोबत जगातील सर्वात मोठ्या नौदलाच्या साथीने चीन हिंदी महासागर क्षेत्रात स्वत:चे वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. चीनने या क्षेत्रात सर्वेक्षण आणि संशोधन ‘हेर नौकांच्या जवळपास स्थायी तैनातीच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
चीन-पाकिस्तान यांच्यात साटंलोटं
सागरी क्षेत्रात वेगाने वाढणाऱ्या चीन-पाकिस्तानच्या भागीदारीमुळे भारतासमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. चीन पाकिस्तानला एक मजबूत नौदल निर्माण करण्यास मदत करत आहे. चीनने यापूर्वीच पाकिस्तानला चार टाइप 054ए/पी मल्टी रोल फ्रिगेट्स पुरविल्या आहेत. तसेच 8 युआन-क्लास डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या लवकरच उपलब्ध करून देणार आहे. 2028-29 पर्यंत पाकिस्तानकडे भारताच्या नौदलाच्या पश्चिम कमांडइतके सागरी बळ असेल असा अनुमान आहे.