भारत-चीनची सैन्यमाघार
चर्चेदरम्यान सहमती : लडाखमधील गोगरा-हॉट स्पिंग पेट्रोलिंग पॉईंटवरून माघारीला प्रारंभ
सकारात्मक...
- कार्यवाहीसंबंधी भारत-चीनचे संयुक्त निवेदन
- सीमेवर शांतता आणि विश्वास राखण्यास मदत
- 17 जुलैच्या चर्चेत दोन्ही देशांमध्ये एकमत
लडाख / वृत्तसंस्था
लडाखमधील गोगरा-हॉट स्पिंग (पीपी-15) येथून गुरुवारपासून भारत आणि चीनच्या सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केली आहे. भारत-चीनने संयुक्त निवेदन जारी करून ही माहिती दिली. दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी कमांडर स्तरावरील चर्चेच्या 16 व्या फेरीत माघार घेण्याचे मान्य केले होते. 8 सप्टेंबर 2022 पासून सैन्य मागे घेण्यावर सहमती झाल्यानुसार दोन्ही देशांच्या सैन्याने नियोजनबद्ध पद्धतीने माघार घ्यायला सुरुवात केली असल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची 16 वी फेरी 17 जुलै रोजी झाली होती. या चर्चेच्या फेरीमध्ये दोन्ही देशांमध्ये सहमती झाली होती.
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चेच्या फेऱया सुरू होत्या. 17 जुलै रोजी भारतीय हद्दीतील चिशूलमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर झालेल्या चर्चेत सैन्यमाघारीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता ही सीमा तोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चर्चेत ठरल्यानुसार दोन्ही देशांचे सैन्य गोगरा आणि हॉट स्पिंग म्हणजेच पीपी-15 येथून माघार घेत आहेत. या सैन्यमाघारीमुळे सीमेवर शांतता आणि विश्वास राखण्यास मदत होईल.
ऑगस्ट 2021 मध्ये गस्त बिंदू 17 वरून माघार
8 सप्टेंबर रोजी दोन्ही देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांचे सैन्य या ठिकाणाहून नियोजनबद्ध पद्धतीने माघार घेतील असे म्हटले आहे. यापूर्वी, फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या सहमतीनुसार दोन्ही देशांच्या सैन्याने ऑगस्टमध्ये पँगाँग लेक आणि गोगरा हॉट स्पिंगच्या गस्त बिंदू 17 वरून माघार घेतली होती. जून 2020 रोजी गलवान खोऱयात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक चकमक झाली होती, ज्यामध्ये भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते आणि चीनचे सुमारे 40 ते 45 सैनिक मारले गेले होते.
तणाव कमी होण्याचे संकेत
पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने सीमेवर 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. भारतानेही जवळपास तेवढेच सैनिक तैनात केले असून चीनच्या कोणत्याही कृतीला उत्तर देण्याची तयारी भारताने केली होती. मात्र, लष्करी पातळीवरील चर्चेच्या फेऱयांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये सीमेवर शांतता असल्याचे दिसून येत होते. भारत आणि चीन यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला लडाख सीमेवरील तणाव आता कमी होण्याची संकेत मिळत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून एलएसीवर दोन्ही देशांमध्ये वाद झाला होता. लडाख सीमेवरील वाद मिटला असला तरी डेपसांग प्लेन आणि डेमचोक सारख्या जुन्या फ्लॅश पॉईंट्सवर अजूनही तणाव कायम आहे. तरीही आता परस्पर समन्वयाने झालेल्या सैन्यमाघारीने सीमावर्ती भागात शांततेसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.