भारत-कॅनडाची अधिकाऱ्यांवर कारवाई
दोन्ही देशांमधील तणावात वाढ, कॅनडाचा थेट आरोप, भारताचे चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, ओटावा
भारत आणि कॅनडातील राजनैतिक तणाव आणखी वाढला आहे. हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात भारताचा हात आहे, असा थेट आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केला आहे. तसेच असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे प्रतिपादन केले आहे. भारतानेही कॅनडावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन बिनबुडाचे वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या प्रत्येकी सहा उच्चायोग अधिकाऱ्यांची पाठवणी करण्याचा आदेश दिला आहे. कॅनडा भारताच्या विरोधात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनाही या वादात ओढण्याची तयारी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. भारताने कॅनडाच्या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले असून ट्रूडो कॅनडातील निवडणुकीत स्वत:ची बाजू सावरण्यासाठी भारताची बदनामी करीत असल्याचा गंभीर आरोप भारताने मंगळवारी केला आहे.
सोमवारी भारताने कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. कॅनडामध्ये ट्रूडो यांची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. त्यांना निवडणुकीत तेथील शीख मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ते तेथील खलिस्तानवाद्यांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते भारताच्या हिताचा बळी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी केलेले सर्व आरोप धादांत असत्य आहेत, अशी प्रतिटीका भारताने केली होती.
व्यक्तीगत आरोप
भारत माझ्यावर व्यक्तीगत आरोप करीत आहे, असा नवा आरोप ट्रूडो यांनी केला. हे सहन केले जाणार नाही. कॅनडात संघटित गुन्हेगारी वाढत असून त्यासाठी भारत जबाबदार आहे. भारत कॅनडातील गुन्हेगारांची पाठराखण करीत आहे. हा कॅनडाच्या अंतर्गत व्यवहारातील हस्तक्षेप आहे. भारताविरोधात आम्ही कारवाई करणार आहोत, अशी अनेक प्रक्षोभक वक्तव्ये त्यांनी सोमवारी केली.
पत्रकारांनीच केला भांडाफोड
जस्टीन ट्रूडो यांच्या भारतविरोधी वक्तव्यांचा भांडाफोड कॅनडातील काही पत्रकारांनीच केला आहे. ट्रूडो कोणत्याही पुराव्यांशिवाय आरोप करीत आहेत. ते विश्वासार्ह नाहीत, असे प्रतिपादन कॅनडातील एक मान्यवर पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी केला. ट्रूडो यांच्या सरकारने केलेले हे आरोप अप्रामाणिक असण्याची शक्यता मोठी आहे. ट्रूडो आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आपल्या बोटचेप्या भूमिकेमुळे कॅनडामध्ये दहशतवाद वाढविला आहे आणि दंगलखोरांना पाठीशी घातले आहे, अशी कॅनडातील सर्वसामान्य जनतेची भावना झाली आहे. कॅनडाच्या हिताची आणि कॅनेडियन नागरीकांच्या सुरक्षेची त्यांना चिंता नाही, असे त्यांच्या सरकारसंबंधी सर्वसामान्य जनतेचे मत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
पुरावा असल्याचा दावा
कॅनडाने भारताच्या उच्चायोग अधिकाऱ्यांची पाठवणी करण्याचा घेतलेला निर्णय पुराव्यांवर आधारित आहे, असा दावा कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री मेलेनी जोली यांनी केला आहे. हरदीपसिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणाची चौकशी कॅनडामध्ये होत असून भारताने या चौकशीला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कॅनडाच्या अर्थमंत्र्यांनीही भारतावर आरोप केले आहेत.
भारताच्या हस्तकांवर आरोप
भारत सरकारचे हस्तक कॅनडात हिंसाचार आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप कॅनडाने पुन्हा केला. कॅनेडियन नागरीकांच्या हत्येचे प्रकार आम्ही सहन करणार नाही. कॅनडाजवळ भारत सरकारच्या हस्तकांच्या सहभागाचे अनेक स्पष्ट पुरावे आहेत. त्यामुळेच आम्हाला भारताच्या विरोधात कारवाई करावी लागली, असा कॅनडाचे पंतप्रधान आणि सरकारचा दावा आहे.
अन्य देशांना ओढण्याचा प्रयत्न
कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा गट असून त्यांच्यात एकमेकांना गुप्त माहिती पुरविण्याचा करार झाला आहे. या चार देशांपैकी कोणत्याही देशाविरोधात काही कारवाई केली जात असेल तर अशा कारवाईची माहिती हे चार देश एकमेकांना देतात. या कराराचा गैरफायदा भारताच्या विरोधात उठविण्याचा प्रयत्न ट्रूडो करीत आहेत. ते निज्जर हत्या प्रकरणाच्या माध्यमातून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियालाही भारताच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी उद्युक्त करीत आहेत, अशी माहिती जाणकार सूत्रांनी मंगळवारी दिली.