भारत ब चा अफगाणवर शानदार विजय
वृत्तसंस्था / बेंगळूर
19 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या तिरंगी वनडे मालिकेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात वेदांत त्रिवेदीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारत ब ने अफगाणचा 2 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील भारत ब चा हा पहिला विजय आहे.
या स्पर्धेत भारत ब संघाला यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांमध्ये अफगाण आणि भारत अ संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. मंगळवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाण संघाने 50 षटकात 9 बाद 202 धावा जमविल्या. त्यानंतर भारत ब संघाने 48.1 षटकात 8 बाद 206 धावा जमिवत हा सामना 11 चेंडू बाकी ठेवून 2 गड्यांनी जिंकला.
गेल्या आठवड्यात या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात अफगाणने आपल्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर भारत ब चा 71 धावांनी पराभव केला होता. मात्र मंगळवारच्या सामन्यात त्यांनी आपल्या डावाला सावध सुरूवात केली. पहिल्या 7 षटकात त्यांनी केवळ 25 धावा जमविल्या. उस्मान सदात केवळ 3 धावांवर बाद झाला. दिपेश देवेंद्रनने त्याला अन्वय द्रवीड करवी झेलबाद केले. अन्वय हा राहुल द्रवीडचा मुलगा आहे. त्यानंतर अफगाण संघातील फैजल शिनोझेदा रोहीत दासच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यांनी एक धाव जमविली. किशोरने खलिद अहमदझाईला 18 धावांवर बाद केले. नझीफुल्ला अमीरीने 17 तर स्टेनीकझाईने 24 धावा जमविल्या. त्यामुळे अफगाणला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. अफगाण संघातील निझाईने 107 चेंडूत 96 धावांचे योगदान दिले. 25 षटकाअखेर अफगाणची स्थिती 5 बाद 78 अशी होती. अफगाण संघाचा कर्णधार जॉर्जने 71 चेंडूत 42 धावा जमविल्या. भारत ब संघातर्फे व्हि.के. किशोरने 19 धावांत 3 तर दिपेश देवेंद्रन आणि रोहीत दास यांनी प्रत्येकी 2, अर्णव बुग्गा आणि वेदांत त्रिवेदी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत ब चा कर्णधार अॅरोन जॉर्जने 42, दिपेश देवेंद्रनने नाबाद 20, व्हि. के. किशोरने नाबाद 29 धावा झळकविल्या. वेदांत त्रिवेदीने 102 चेंडूत 83 धावांची खेळी केली. अफगाण संघातील नझीफुल्ल अमेरी आणि सलमान खान यांनी प्रभावी गोलंदाजी केली. भारत ब ची एकवेळ स्थिती 30 षटकात 6 बाद 115 अशी होती.
संक्षिप्त धावफलक: अफगाण 50 षटकात 9 बाद 202 (मिझाई 96, अमेरी 17, स्टेनिकझाई 24, खलिद अहमदझाई 18, बी. के. किशोर 3-19, देवेंद्रन व रोहीत दास प्रत्येकी 2 बळी, बुग्गा आणि त्रिवेदी प्रत्येकी 1 बळी), भारत ब 48.1 षटकात 8 गडी बाद 206 (वेदांत त्रिवेदी 83, अॅरोन जॉर्ज 42, बी. के. किशोर नाबाद 29, देवेंद्रन नाबाद 20).