भारताचा बांगलादेशवर 13 गोल्सनी दणदणीत विजय
वृत्तसंस्था, जालंधर : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आपल्या जेतेपदाच्या बचावासाठी मैदानात उतरलेल्या भारताने मंगळवारी बांगलादेशवर 13-0 असा दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात मनदीप सिंगने शानदार हॅट्ट्रिक नोंदवत फॉर्ममध्ये पुनरागमन केले.
मनदीपने तिसऱ्या, 10 व्या आणि 54 व्या मिनिटाला गोल केले. कर्णधार हरमनप्रीत सिंग (दुसऱ्या व 44 व्या मिनिटाला), दिलप्रीत सिंग (43 व्या, 44 व्या मिनिटाला) आणि उपकर्णधार हार्दिक सिंग (60 व्या मिनिटाला दोन) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियमवर झालेल्या या एकतर्फी सामन्यात शिलानंद लाक्रा (15 व्या मिनिटाला), अभिषेक (18 व्या मिनिटाला), निलकांता शर्मा (26 व्या मिनिटाला) आणि जुगराज सिंग (46 व्या मिनिटाला) यांनीही भारतासाठी गोल नोंदवले.
सामन्यात पूर्णपणे भारताचे वर्चस्व होते आणि खेळाचा बराचसा भाग बांगलादेशच्या क्षेत्रातच खेळला गेला. भारताला पहिल्याच प्रयत्नात पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर कर्णधार हरमनप्रीत सिंगने दुसऱ्या मिनिटाला ‘लो फ्लिक’द्वारे आघाडी मिळवून दिली. एका मिनिटानंतर भारताच्या दुसऱ्या गोलमध्येही हरमनप्रीतची महत्त्वाची भूमिका राहिली. मिडफिल्डवरून त्याने दिलेल्या पासवर मनदीप सिंगने वर्तुळाच्या टोकावरून जोरदार फटका मारत आघाडी दुप्पट केली.
10 व्या मिनिटाला हरमनप्रीतच्या लांब ‘स्कूप’ पासवर अभिषेकने चेंडूवर ताबा मिळवला आणि तो मनदीपच्या दिशेने सरकवला, ज्यावर मनदीपने चेंडू गोलजाळीत सारला. पहिल्या सत्राच्या अगदी शेवटच्या क्षणी शिलानंद लाक्राने सुखजित सिंगसोबतच्या उत्तम ताळमेळातून गोल करत आघाडी 4-0 अशी केली. दरम्यान, एका विचित्र घटनेत अचानक एक भटका कुत्रा मैदानावर शिरला आणि त्याने टर्फवर घाण केली, ज्यामुळे दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीस काही काळ विलंब झाला.
त्यानंतर भारतातर्फे गोलांचा वर्षाव झाला. 18 व्या मिनिटाला मनदीपने दिलेल्या उत्कृष्ट ‘वन-टच’ पासवर अभिषेकने गोल नोंदवला. 26 व्या मिनिटाला सुखजित सिंग आणि अभिषेकच्या पासवर निलाकांताने वर्तुळाच्या बाहेरून एक जोरदार ‘टोमाहॉक’ फटका मारून गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताकडे 6-0 अशी भक्कम आघाडी होती. तिसऱ्या सत्रातही भारताचा गोल करण्याचा धडाका सुरूच राहिला. दिलप्रीतने अवघ्या एका मिनिटात दोन गोल केले. हरमनप्रीतचा ‘फ्लिक’ बांगलादेशच्या गोलरक्षकाने अडवल्यानंतर परत आलेल्या चेंडूवर दिलप्रीतने पहिला गोल केला. काही सेकंदांतच त्याने पुन्हा एक जोरदार ‘टोमाहॉक’ मारून आपला दुसरा गोल नोंदवला. इतकेच नव्हे, तर त्यानंतर काही क्षणांतच भारताला मिळालेल्या पाचव्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने आपला दुसरा गोल केला.
चौथ्या सत्राच्या सुऊवातीलाच भारताला सातवा पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर जुगराज सिंगने गोल केला. त्यानंतर मनदीपने आदित्य लालागेच्या पासवर सूर मारून चेंडूला दिशा दिली आणि आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. सामना संपायला एक मिनिट बाकी असताना भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, ज्यापैकी दुसऱ्या संधीवर हार्दिकने परत आलेल्या चेंडूवर गोल केला. काही सेकंदांतच हार्दिकने आणखी एक ‘फील्ड गोल’ करत भारताच्या गोलसंख्येत भर टाकली. आता भारत गुऊवारी चीनविऊद्ध खेळणार आहे, तर बांगलादेशचा सामना मलेशियाशी होईल.
आजचे सामने
मलेशिया विरुद्ध दक्षिण कोरिया, दुपारी 2:30 वा.
जपान विरुद्ध बांगलादेश, संध्याकाळी 4:45 वा.
भारत विरुद्ध चीन, संध्याकाळी 7:00 वा.
