भारताकडून मालदीवचा 3-0 ने धुव्वा
वृत्तसंस्था/ थिम्पू
दुसऱ्या सत्रातील बदली खेळाडू हेमनीचुंग लुंकिमच्या दोन गोलांच्या जोरावर भारताने येथे सॅफ 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत मालदीवचा 3-0 असा धुव्वा उडवला. 14 व्या मिनिटाला सॅमसन अहोंगशांगबामने भारताला आघाडी मिळवून दिल्यानंतर चांगलिमिथांग स्टेडियमवरील ‘अ’ गटातील या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात लुंकिमने 74 व्या आणि 89 व्या मिनिटाला गोल केले.
तीन संघांच्या गटात यापूर्वीच बांगलादेशवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या भारताने ‘अ’ गटात सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. बांगलादेशनेही या गटातून दुसऱ्या स्थानाचे मानकरी म्हणून अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. आता भारताचा सामना 28 सप्टेंबर रोजी पहिल्या उपांत्य सामन्यात ‘ब’ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी (भूतान, पाकिस्तान किंवा नेपाळ) होईल.
मालदीवविरुद्ध सॅमसनने नेत्रदीपक पद्धतीने झेपावत हाणलेल्या हेडरसह खाते उघडले. यावेळी उजव्या बाजूहून मानभाकुपर मलनगियांगने दिलेल्या क्रॉसला त्याने अचूक टिपले. दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू लुंकिमने 74 व्या मिनिटाला भारताची आघाडी दुप्पट केली. यावेळी मालदीवचा गोलरक्षक हसन नासिरला फटका नीट रोखता आला नाही.
89 व्या मिनिटाला सुरेख लाँग रेंजरसह दुसरा गोल केल्यानंतर लुंकिम हा दिवसाचा स्टार ठरला. खेळाडूंना बदलण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक इश्फाक अहमद यांनी बांगलादेशविऊद्ध खेळलेल्या सुऊवातीच्या अकरा खेळाडूंमध्ये तीन बदल केले आणि करिश सोराम, ऋषी सिंग आणि मलंगियांग यांना आणले.