बांगलादेशला 2-0 ने नमवून भारत विजेता
सॅफ 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेवरील वर्चस्व कायम राखण्यात यश
वृत्तसंस्था/ थिम्पू
सॅफ 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेवरील भारताचे वर्चस्व कायम राहिले असून त्यांनी सोमवारी येथील चांगलिमिथांग स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेशचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद राखले. पहिल्या सत्रातील वेगवान खेळानंतर मोहम्मद कैफने 58 व्या मिनिटाला सुरेख हेडरद्वारे भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बांगलादेशचे राहिलेले आव्हानही मोहम्मद अरबशने शेवटच्या पाच मिनिटात गोल करून संपुष्टात आणले.
भारतीय युवा संघाने सुऊवातीपासूनच आक्रमक पवित्रा पत्करला. परंतु बांगलादेशने आक्रमक खेळ करणे टाळून अत्यंत बचावात्मक मानसिकता दाखविल्याने त्या संघाविऊद्ध लक्ष्य भेदणे कठीण बनले. जेव्हा जेव्हा भारतीय खेळाडू विरोधी भागात चेंडू नेण्यात यशस्वी झाले तेव्हा तेव्हा त्यांचा मार्ग अनेक खेळाडूंच्या फळीने अडविला. मात्र 58 व्या मिनिटाला कॉर्नर किकवर भारताला पहिला गोल नोंदविण्यात यश प्राप्त झाले. यावेळी चेंडू सहा यार्डांच्या क्षेत्रात, तरीही गोलरक्षकाच्या आवाक्याबाहेर ठेवण्यात कर्णधार नगामगौहौ मेटला यश आले.
त्याआधी काही महत्त्वाच्या वेळी गोलक्षेत्रात चेंडूला स्पर्श करण्यात अपयशी ठरलेल्या कैफने तशी चूक पुन्हा केली नाही. त्याच्या अचूक हेडरने बांगलादेशचा गोलरक्षक नाहिदुल इस्लामला हालचाल करण्याची फारशी संधी दिली नाही. पण त्यानंतरही बांगलादेश निराश झाला नाही. किंबहुना, भारताने घेतलेल्या पुढाकाराने त्यांना सकारात्मक दृष्टिकोनाने वावरण्यास आणि बचावात्मक मानसिकतेतून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यातून 67 व्या मिनिटाला भारतावर गोल होता होता वाचला. त्यावेळी गोलरक्षक अहेबाम सूरज सिंगला त्याच्या स्थानावरून धावून बाहेर आला होता.
भारताकडे आघाडी असली, तरी त्यावर समाधान मानण्यास तयार नसलेल्या संघाने त्यांचा आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्यामुळे खेळ मनोरंजक झाला. निर्धारित वेळ संपल्यानंतरच्या इंज्युरी वेळेत जेव्हा चेंडू गोलक्षेत्राच्या आत अर्बशकडे पोहोचला तेव्हा भारताला चिकाटीने केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळाले. त्याने डाव्या पायाने हाणलेला फटका जाळ्यात गेला आणि भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.