भारत-बांगलादेशमधील सीमा चर्चा लांबणीवर
आता पुढील महिन्यात दिल्लीत चर्चा होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि बांगलादेश यांच्यातील डीजी स्तरावरील चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे. शेजारी देशाने योजनेत बदल केल्यानंतर आता पुढील महिन्यात दिल्लीत ही चर्चा होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशातील शेख हसीना सरकार पडल्यानंतर भारताचे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि बांगलादेशचे बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यातील ही पहिली द्विवार्षिक बैठक होती. आता पुढील बैठक 18 ते 22 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत होणार असल्याची माहिती देण्यात आली. दोन्ही देशांच्या महासंचालक स्तरावरील ही 55 वी बैठक असेल. यामध्ये दोन्ही देशांच्या गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सर्व अधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच अमली पदार्थ विरोधी, सीमाशुल्क आणि इतर काही फेडरल एजन्सींचे अधिकारी देखील सहभागी होतील. या बैठकीत पारंपारिक समस्या, व्यापक सीमा व्यवस्थापन, सीमापार गुह्यांना आळा घालण्यासाठी परस्पर समन्वय आणि गुप्त माहितीची देवाणघेवाण या विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
बांगलादेश सीमेवरील सुरक्षेचा आढावा
वास्तविक बीएसएफ भारताच्या पूर्व भागात बांगलादेशला लागून असलेल्या 4,096 किमी लांबीच्या सीमेचे रक्षण करते. सध्या भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. बांगलादेशमध्ये 5 ऑगस्टच्या घटनांनंतर आमच्या समकक्षांशी आमचे चांगले संबंध आहेत. तथापि, फील्ड युनिट्स अलर्ट मोडवर आहेत. अलिकडेच मंत्रालय स्तरावर बांगलादेश सीमेचा व्यापक आढावा घेण्यात आल्यानंतर परिस्थिती समाधानकारक असल्याचे घोषित करण्यात आले. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत सीमेवर तैनात बीएसएफ, सीमाशुल्क आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांना बेकायदेशीर घुसखोरी आणि सीमापार गुह्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.
1975 ते 1992 दरम्यान डीजी स्तरावरील सीमा चर्चा दरवषी आयोजित करण्यात आली होती, परंतु 1993 मध्ये ती द्वि-वार्षिक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही पक्ष आळीपाळीने नवी दिल्ली आणि ढाका या संबंधित राष्ट्रीय राजधानीत बैठकीचे आयोजन करतात. यापूर्वीची बैठक मार्चमध्ये ढाका येथे झाल्याचे सांगण्यात येते.