भारत-ऑस्ट्रेलिया रंगणार मेगाफायनल
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप : रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा द.आफ्रिकेवर तीन गड्यांनी विजय : सामनावीर ट्रॅव्हिस हेडची अष्टपैलू खेळी : चोकर्सचा डाग पुसण्यासाठी आफ्रिकेची शेवटपर्यंत झुंज
वृत्तसंस्था /कोलकाता
ईडन गार्डन्स स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्ल्ड कपची फायनल 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. प्रारंभी, ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा डाव 49.2 षटकांत 212 धावांवर आटोपला. 213 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑसी संघाची चांगलीच दमछाक झाली पण अखेरीस त्यांनी 47.2 षटकांत 7 गडी गमावत विजयी लक्ष्य पार केले. दरम्यान, आफ्रिकेच्या फिल्डर्सनी गचाळ फिल्डिंग करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सात ते आठ जीवदाने दिली. त्याचा मोठा फटका आफ्रिकेला बसला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने पाचवेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 हे विश्वचषक ऑस्ट्रेलियाने उंचावले आहेत. 1975 आणि 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सेमीफायनलमध्ये पराभूत होण्याची आफ्रिकेची मालिका यंदाच्या वर्ल्डकपमध्येही कायम राहिली. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेने पाच वेळा उपांत्य फेरी गाठली, पण त्यांना एकदाही फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही.
आफ्रिकेची चिवट झुंज व्यर्थ, ऑस्ट्रेलिया तीन विकेटने विजयी
दक्षिण आफ्रिकेचे 213 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासाठी माफक वाटत होते. कारण ग्लेन मॅक्सवेलनेच एका सामन्यात नाबाद 200 धावा केल्या होत्या. पण सेमी फायनलचे दडपण हे किती जास्त असते, याचा प्रत्यय ऑसी संघाला यावेळी आला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. त्यांना 60 धावांची सलामी मिळाली. ट्रेव्हिस हेडने यावेळी 9 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 62 धावांची खेळी साकारली. पण या सामन्यात डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्हन स्मिथसारखे मातब्बर फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 6 बाद 174 अशी अवस्था झाली होती आणि सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत आला होता. पण त्यानंतर जोस इंग्लिसने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, पण 28 धावांवर बाद झाला. यानंतर सामना चांगलाच रंगतदार झाला. जरी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 20 धावांची गरज असली तरी त्यांच्याकडे फक्त 3 फलंदाज शिल्लक होते. एका बाजूने स्टार्क सावध फलंदाजी करत होता. त्याला साथ देण्यासाठी कर्णधार पॅट कमिन्स आला होता. या दोघांनी आणखी पडझड न होऊ देता सामना 47.2 षटकात 213 धावांच आव्हान पार केले. स्टार्कने नाबाद 16 तर कमिन्सने नाबाद 14 धावा केल्या.
आफ्रिकन फलंदाजांची सपशेल निराशा
दक्षिण आफ्रिकन कर्णधार बवुमाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चांगलाच चुकीचा ठरला. कर्णधार टेम्बा बवुमा पहिल्या षटकात बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने विकेटकीपर जोस इंग्लिसच्या हाती झेलबाद केले. यानंतर दुसरा सलामीवीर क्विंटन डीकॉकदेखील सहाव्या षटकात संघाच्या 8 धावा झाल्या असताना बाद झाला. डी कॉकला हेझलवूडने बाद केले. त्याला 14 चेंडूत 3 धावा करता आल्या. अनुभवी ड्युसेन (6) व मॅरक्रम (10) यांनाही फारसा चमत्कार दाखवता आला नाही. अवघ्या 24 धावांत 4 विकेट गेल्याने आफ्रिकन संघ चांगलाच अडचणीत आला. अशा परिस्थितीत हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी पाचव्या गड्यासाठी 95 धावांची भागीदारी करत आफ्रिकेला 100 धावांच्या पुढे नेले. दोघांनीही सुरुवातीला संयमी खेळी केली. त्यानंतर फटकेबाजीला सुरुवात केली. दोघांनाही चौफेर फटकेबाजी केली. क्लासेनला चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. त्याने 48 चेंडूत 47 धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. यानंतर ट्रॅव्हिस हेडने क्लासेन आणि मार्को यान्सेनला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत आफ्रिकन संघाला पुन्हा बॅकफूटवर आणले.
डेव्हिड मिलर एकटा लढला
क्लासेनची साथ सुटल्यानंतर मिलरने एकट्याने किल्ला लढवला. त्याने जेराल्ड कॉट्झीला सोबत घेत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. दरम्यान, त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र जेराल्ड 19 धावा करून बाद झाला. दुस बाजूने मिलरने आपला झंजावात कायम राखत 115 चेंडूत शतक ठोकले. शतकाबरोबरच त्याने अफ्रिकेला 200 धावांच्या पार देखील पोहचवले. संपूर्ण संघ आल्या पावली माघारी फिरत असताना एकटा डेव्हिड मिलर कांगारूंच्या गोलंदाजांना भिडला. त्याने 116 चेंडूत 8 चौकार व 5 षटकारासह 101 धावा करत शतक ठोकले. मात्र तो शतकानंतर लगेचच बाद झाला. मिलर बाद झाल्यानंतर आफ्रिकेचा डावही 49.4 षटकांत 212 धावावर संपुष्टात आला. केशव महाराजने 4, रबाडाने 10 तर शाम्सी एका धावेवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका 49.2 षटकांत सर्वबाद 212 (मॅरक्रम 10, क्लासेन 47, डेव्हिड मिलर 101, कॉटझी 19, स्टार्क 34 धावांत 3 बळी, कमिन्स 51 धावांत 3 बळी, हॅझलवूड व हेड प्रत्येकी दोन बळी).
ऑस्ट्रेलिया 47.2 षटकांत 7 बाद 215 (ट्रॅव्हिस हेड 62, वॉर्नर 29, स्टीव्ह स्मिथ 30, लाबुशेन 18, जोस इंग्लिस 28, स्टार्क नाबाद 16, पॅट कमिन्स नाबाद 14, कोटीझ व शाम्सी प्रत्येकी दोन बळी, रबाडा, मॅरक्रम व महाराज प्रत्येकी एक बळी).