For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून

06:22 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर चषकासाठी 5 सामन्यांची कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिला सामना अॅडलेड ओव्हल येथे खेळविण्याचा निर्णय घेतला होता. पण आता हा सामना अॅडलेड ओव्हल ऐवजी पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर होणार असल्याचा खुलासा केला आहे.

ही मालिका दोन्ही संघांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची समजली जाते. या मालिकेतील दुसरा सामना दिवस-रात्रीचा असून या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाईल. ही दुसरी कसोटी 6 ते 10 डिसेंबर दरम्यान अॅडलेड येथे होणार आहे. या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथे 14 ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील चौथा सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबॉर्न येथे होणार असून ही कसोटी बॉक्सिंग डे म्हणून ओळखली जाईल. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनीमध्ये 3 ते 7 जानेवारी 2025 दरम्यान होणार आहे. ऑस्ट्रेलियातील आगामी उन्हाळी क्रिकेट मोसमातील ही महत्त्वाची मालिका म्हणून गणली जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी आपल्या संघाच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाची घोषणा केली.

Advertisement

पर्थच्या ऑप्टस स्टेडियमला पहिल्यांदाच कसोटी सामन्यांच्या यजमान पदाची संधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उपलब्ध करुन दिली आहे. पर्थ आणि अॅडलेड ही ऑस्ट्रेलियातील प्रमुख कसोटी ठिकाणे म्हणून ओळखली जातात. या मालिकेला शौकिनांचा अधिक प्रतिसाद लाभेल अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे दौरा कार्यक्रम विभागाचे प्रमुख पिटर रॉच यांनी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या भारताच्या तुलनेत थोड्या अधिक टणक आणि चेंडू अधिक उसळी घेणाऱ्या आहेत. या मालिकेतील अॅडलेडची दुसरी कसोटी दिवस-रात्रीची होणार असल्याने या सामन्याला अधिक महत्त्व राहिल. पर्थचे ऑप्टस स्टेडियम हे ऑस्ट्रेलियाला आजपर्यंत यशदायी ठरले आहे. या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्व म्हणजे चार कसोटी सामने जिंकले आहेत. आता पर्थच्या ऑप्टस स्टेडियमची तुलना गब्बा मैदानाबरोबर केली जाते. पण पर्थच्या तुलनेत गब्बाचे मैदान अधिक दर्जेदार असल्याचे मत काहीजणांनी व्यक्त केले आहे. तर काहीजण गब्बापेक्षा पर्थ हे दर्जेदार असल्याचे सांगतात.

Advertisement

या उभय संघातील कसोटी मालिकेसाठी विजेत्याला बॉर्डर-गावस्कर चषक दिला जाणार आहे. 1991-92 पासून उभय संघातील कसोटी मालिकेला प्रारंभ झाला आणि पहिल्या बॉर्डर गावसकर चषक कसोटी मालिकेत 4 सामने आयोजित केले होते. आता या रुपरेषेमध्ये बदल करण्यात आला असून यावेळी मात्र 5 सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेत गेल्या 4 वेळेला भारताने सलग विजेतेपद मिळविले आहे. 2018-19 तसेच त्यानंतर 2020-21 दरम्यानची बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिका भारताने जिंकली आहे. पण पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या वर्षी लंडनमध्ये झालेल्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. 22 नोव्हेंबरपासून खेळविल्या जाणाऱ्या या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये 9 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे. या कालावधित खेळाडूंना सरावाची संधी मिळणार असून या सरावात त्यांना गुलाबी चेंडूचा वापर करता येईल. भारतीय संघाला गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर त्यानी पुढील सामने जिंकून मालिका हस्तगत केली होती.

Advertisement
Tags :
×

.