भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना आज
वृत्तसंस्था/मेलबर्न
ऑस्ट्रेलियाविऊद्धचा भारताचा दुसरा टी-20 सामना आज शुक्रवारी येथे भव्य एमसीजीवर होणार असून या सामन्याकरिता भारताने जोरदार तयारी केली आहे. युवा प्रतिभेचा ओघ आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या फॉर्ममध्ये पुनरागमनामुळे भारताचे आव्हान अधिक बळकट झाले आहे.
अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यासारखे खेळाडू त्यांच्या अथक पॉवर-हिटिंगच्या जोरावर टी-20 फलंदाजीच्या कलेला वेगळे वळण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियात आलेले आहेत. परंतु त्यांच्या कर्णधाराकडून मोठ्या डावांचा अभाव अलीकडच्या काळात संघासाठी थोडासा त्रासदायक ठरला होता. मात्र पाच सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमारने 24 चेंडूंत 39 धावा फटकावल्या आणि जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर 125 मीटरचा षटकारही खेचला, जो बराच काळ स्मरणात राहील.
तथापि, कॅनबेरामध्ये पावसाने वर्चस्व गाजवून शेवटी सामना रद्द करण्यात आला. भारताची 9.4 षटकांनंतर 1 बाद 97 अशी मजबूत स्थिती होती आणि सूर्यकुमार आणि शुभमन गिल दोघेही ऑस्ट्रेलियन आक्रमणाला उद्ध्वस्त करण्याच्या मूडमध्ये होते. आज शुक्रवारी मेलबर्नमध्येही पावसाचा अंदाज आहे, परंतु त्याची चिंता न करता पाहुण्या संघाला मालिकेतील पहिल्या सामन्यात जिथे थांबले होते तिथून पुन्हा सुऊवात करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
दुसऱ्या सामन्यात संघ उतरताना भारतीयांना सर्वांत जास्त आनंद सूर्यकुमारचा फॉर्म परतल्याने झालेला असेल. कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी राबविलेल्या अधिक जोखमी, अधिक परतावा या दृष्टिकोनासह विश्वचषकाच्या मार्गावर संघाचा प्रवास सुरू आहे. गंभीरची त्याच्या संघाने नियमितपणे 250, 260 पेक्षा जास्त धावा कराव्यात अशी इच्छा आहे आणि जरी ते तसे करण्याचा प्रयत्न करत असताना 120-130 धावांवर बाद झाले आणि या प्रक्रियेत काही सामने गमावले, तरी त्याला त्यांची काही हरकत नाही, असे दिसून येते. अलीकडच्या काही महिन्यांतील त्यांची स्फोटक फलंदाजी हे स्पष्ट संकेत देते की, फलंदाजांनी टी-20 विश्वचषकाच्या काही महिने आधी गंभीरचे तत्त्वज्ञान स्वीकारले आहे. टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत होणार आहे, जिथे ‘मेन इन ब्ल्यू’ गेल्या उन्हाळ्यात अमेरिकेत जिंकलेल्या विजेतेपदाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतील.
भारताला कॅनबेरामध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्या विभागाचा विचार केला, तर त्यांच्याकडे जसप्रीत बुमराहचा दर्जा आणि वऊण चक्रवर्तीची युक्ती आहे. कुलदीप यादव आणि अक्षर पटेलसारख्यांचा समावेश असलेला शक्तिशाली मारा आहे, जो फलंदाज अपयशी ठरल्यास लहान धावसंख्येचा बचाव देखील करू शकतो. तरीही त्यांना ऑस्ट्रेलियाचे मोठे फलंदाज मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांना रोखण्याचे काम करावे लागेल, ज्यांनी भूतकाळात भारताला त्रास दिलेला आहे.
ऑस्ट्रेलियाचे टी-20 तील धोरण भारतीय संघाने स्वीकारलेल्या धोरणासारखेच आहे, ज्यामध्ये सामन्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून प्रामुख्याने आक्रमक क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रीत केले जाते. हेड, मार्श, मार्कस स्टोइनिस, टिम डेव्हिड आणि जोश इंग्लिससारख्या खेळाडूंच्या रूपाने त्यांच्याकडे मोठी धावसंख्या उभारण्यासाठी किंवा अवघड पाठलाग करण्यासाठी समर्थ खेळाडू आहेत. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क टी-20 मधून निवृत्त झाल्याने आणि पॅट कमिन्स दुखापतीतून सावरत असल्याने गोलंदाजीचा अनुभव थोडा कमी दिसत आहे आणि झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन एलिस यांचा समावेश असलेल्या माऱ्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी हेझलवूडवर आहे.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रे•ाr, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वऊण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट (सामने 1-3), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन (सामने 3-5), टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जोश हेझलवूड (सामने 1-2), ग्लेन मॅक्सवेल (सामने 3-5), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस.
सामन्याची वेळ : दुपारी 1:45 वा.