भारत-ऑस्ट्रेलिया हॉकी मालिका बरोबरीत
वृत्तसंस्था/पर्थ
यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला संघातील चार सामन्यांची मित्रत्वाची हॉकी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या शेवटच्या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंना सलग पेनल्टी कॉर्नर्सची संधी मिळाली होती. पण त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. 46 व्या मिनिटाला सुशिला चानुने भारताचे खाते उघडून बरोबरी साधली. तत्पूर्वी 10 व्या मिनिटाला ओलिव्हीया डाऊनेसने ऑस्टेलियाचे खाते उघडून आघाडी घेतली होती. नियमित वेळेतील बरोबरीनंतर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतातर्फे नवनीत कौर, इशिका चौधरी, अनु आणि ऋतुजा पिसाळ यांनी प्रत्येकी 1 गोल केला. ऑस्ट्रेलियातर्फे दोन गोल नोंदविले गेले.