महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी आजपासून

06:10 AM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्थच्या हिरव्यागार खेळपट्टीवर टीम इंडियाचा लागणार कस : बुमराहच्या नेतृत्वात  शानदार कामगिरीची अपेक्षा : देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, हर्षित राणाला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/पर्थ

Advertisement

प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावसकर चषक मालिकेला आज शुक्रवारी येथे प्रारंभ होत असून ब्रिस्बेनमधील 2021 च्या आठवणी जरी विस्मृतीत जाणाऱ्या नसल्या, तरी मायदेशी कडवट पराभव स्वीकारावा लागलेला असल्याने भारतावर सध्या प्रचंड दबाव असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाही काही कमी दबावाखाली नाही. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीचे वर्णन फलंदाजी फॉर्मात नसलेल्या दोन संघांमधील लढाई, असेच करावे लागेल. 2018-19 व 2020-21 मध्ये भारताने लागोपाठ दोन मालिका जिंकून आपली चमक दाखविली होती. मात्र अलीकडे ज्या पद्धतीने न्यूझीलंडने घरच्या मैदानांवर पराभव केला त्यामुळे एरव्ही जागतिक दर्जाच्या असलेल्या या संघाच्या मानसिकतेला निश्चितच धक्का बसला आहे.

या संघातील काही तारे त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत हे निर्विवाद सत्य आहे. पॅट कमिन्सच्या संघाविरुद्धची मालिका कशी उलगडते यातून त्यांचे भविष्य निश्चित होऊ शकते. न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी विक्रमी तिसऱ्यांदा जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणे हे भारतासाठी सहज साध्य असल्याचे दिसत होते. मात्र आता तो प्रवेश खूपच कठीण वाटू लागला आहे. कारण त्यासाठी इतर संघांवर विसंबून राहायचे नसेल, तर भारतासाठी 4-0 ने ही मालिका जिंकावी लागेल. ऑस्ट्रेलियन भूमीवर 4-0 असा धुव्वा उडविणे हे भारतीय फुटबॉल संघाने मैत्रिपूर्ण सामन्यात ब्राझील किंवा अर्जेंटिनाला पराभूत करण्याइतके महाकठीण आहे. परंतु ज्यांनी या संघाला जवळून पाहिले आहे त्यांना तो पुनरागमन करू शकतो याचा विश्वास निश्चितच असेल.

रोहित, शमी, शुभमनची उणीव

या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांत झालेल्या मानहानीचा बदला घेण्यासाठी सज्ज असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सामना नियमित कर्णधार (रोहित शर्मा दुसऱ्या अपत्यामुळे पहिल्या कसोटीत सहभागी होणार नाही), रिव्हर्स स्विंगचा वापर करणारा सर्वोत्तम भेदक गोलंदाज (मोहम्मद शमी, अजूनही 100 टक्के तंदुरुस्त नाही) आणि भावी कर्णधार (शुभमन गिल, अंगठा फ्रॅक्चर झाल्याने पहिल्या कसोटीला मुकण्याची वेळ) यांच्याशिवाय करावा लागेल. ऑस्ट्रेलियातील मालिका ही कारकीर्द घडविण्यासाठी किंवा संपुष्टात आणण्यासाठी विख्यात आहे. सचिन तेंडुलकरने वाकातील भेगा पडलेल्या खेळपट्टीवर शतक केले आणि जगाने दखल घेतली, तर दिलीप वेंगसरकर आणि कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्या कारकिर्दीचा 1991-92 मध्ये अस्त झाला. विराट कोहली, अॅडलेडमधील दुसऱ्या कसोटीपूर्वी पोहोचणार असलेला रोहित शर्मा आणि वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांचीही परिस्थिती अशीच असून प्रतिकूल निकालाचे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतात.

कोहलीची ‘किंग कोहली’ म्हणून ख्याती 2014 मध्ये याच देशात नोंदविलेल्या चार शतकांमुळे झाली होती. तर चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत अजूनही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी चौकडीला दु:स्वप्नासारखे सतावत आहेत. ही चौकडी देखील आपली शेवटची बॉर्डर-गावसकर मालिका एकत्र खेळत आहे. वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर बरेच काही अवलंबून राहणार असून सुऊवातीच्या सामन्यात नेतृत्व करणार असलेल्या जसप्रीत बुमराह व इतर गोलंदाजांचा सामना हा अशा फलंदाजी विभागाशी होणार आहे, ज्यांना अलीकडच्या काळात घरच्या मैदानांवरही सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. मोहम्मद सिराज आणि आकाश दीप हे बुमराहचे साथीदार असण्याची शक्यता आहे. परंतु प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा हे देखील शर्यतीत आहेत.

होम ग्राऊंडवर कांगारु फेव्हरेट

असे असले, तरी घरच्या फलंदाजांना कमी लेखणे परवडणारे नाही. सध्याच्या जागतिक कसोटी स्पर्धेत (2023-25) स्टीव्ह स्मिथची सरासरी फक्त 36 आहे, तर 100 हून अधिक कसोटींमध्ये त्याची सरासरी 56 हून अधिक आहे. मार्नस लाबुशेनची कारकिर्दीची सरासरी जवळपास 50 आहे, परंतु गेल्या दोन वर्षांत ती 30 पेक्षा कमी झाली आहे. ट्रॅव्हिस हेडने दोन जागतिक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारताला धक्का दिलेला असला, तरी जागतिक कसोटी स्पर्धेत त्याची सरासरी 28 पेक्षा कमी आहे. उस्मान ख्वाजा, जो त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीसही सातत्य दाखवत आहे, यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी आणि कर्णधार कमिन्स, जो आता एक योग्य अष्टपैलू खेळाडू बनला आहे, हेही साथीला असले, तरी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी फारशी दमदार वाटत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे शेपटू हे जास्त प्रभावी वाटत असून रवींद्र जडेजाऐवजी रविचंद्रन अश्विनला खेळवण्याचा भारत विचार करत आहे. खेळपट्टीवर ओलावा राहील व चेंडू उसळेल हे स्पष्ट असून जडेजाच्या तुलनेत अश्विन गरज भासल्यास सुऊवातीच्या दिवशी खेळपट्टीवर अधिक चांगली गोलंदाजी करू शकतो हे सर्वांना माहीत आहे. अष्टपैलू नितीश रेड्डीला संधी मिळून दररोज 12 ते 15 षटके टाकणारा चौथा वेगवान गोलंदाज म्हणून त्याला संधी मिळू शकते. फलंदाजीत, भारताच्या पहिल्या सहा फलंदाजांपैकी तीन फलंदाज ऑस्ट्रेलियात कधीही खेळलेले नाहीत आणि दोघांना एकत्रित चार सामन्यांचा कसोटी अनुभव आहे. पण यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेलमध्ये दम आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत भारताने तयार केलेल्या सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक असलेला रिषभ पंत आणि शैलीदार के. एल. राहुल साथीला आहे. या सर्वांनी चमक दाखविली, तर भारताचे पारडे खूप जड ठरू शकते.

अश्विन, बुमराहला सुवर्णसंधी

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला आजपासून प्रारंभ होणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. टीम इंडियाच्या गोलंदाजीची प्रमुख मदार ही बुमराहवर असणार आहे. ऑस्ट्रेलियात बुमराहचा उत्कृष्ट फॉर्म कायम राहिला तर तो अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करु शकतो. तसेच फिरकीपटू आर. अश्विनला देखील ऑस्ट्रेलियात मोठे विक्रम रचण्याची नामी संधी असणार आहे. वास्तविक, बुमराहची ऑस्ट्रेलियन भूमीवर कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याने ऑस्ट्रेलियात 7 कसोटी सामन्यांच्या 14 डावात 21.25 च्या सरासरीने 32 बळी घेतले आहेत. पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 3 विकेट्स घेतल्यास, तो अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदीला मागे टाकून ऑस्ट्रेलियातील चौथा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरेल. आर अश्विनलाही मागे टाकण्याची बुमराहला चांगली संधी असेल. ऑस्ट्रेलियामध्ये अश्विन भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे. अश्विनला मागे टाकण्यासाठी बुमराहला 7 विकेट्सची गरज आहे. मात्र, अश्विन विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर बुमराहला खूप मेहनत करावी लागणार आहे. दुसरीकडे अश्विनलाही अनिल कुंबळे आणि कपिल देव यांना मागे टाकण्याची मोठी संधी असेल. अश्विनच्या नावावर ऑस्ट्रेलियात 38 विकेट आहेत. कुंबळेला मागे टाकण्यासाठी अश्विनला 12 विकेट्सची गरज आहे. असे करण्यात तो यशस्वी ठरल्यास ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 50 बळी घेणारा कपिल देव यांच्यानंतरचा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल.

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज

बळी         गोलंदाज

रोहित शर्मा रविवारी पर्थमध्ये दाखल होणार

कर्णधार रोहित शर्मा रविवारी ऑस्ट्रेलियात असणाऱ्या भारतीय संघात दाखल होणार आहे. पहिल्या कसोटीचा तो तिसरा दिवस असणार आहे. कौटुंबिक कारणासाठी तो संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला नव्हता. 15 नोव्हेंबरला त्याला पुत्रलाभ झाल्यानंतर तो आता ऑस्ट्रेलियास जाण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या गैरहजेरीत जसप्रित बुमराह पहिल्या कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे. ‘पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रोहित शर्मा पर्थमध्ये दाखल होणार आहे,’ असे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले. त्यामुळे रोहित अॅडलेडमध्ये 6 डिसेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळणार आहे. रोहित मुंबईत असला तरी तो नियमित सराव करीत होता आणि संघाच्या संपर्कातही होता.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये दिग्गज करणार कॉमेंट्री

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी संपूर्ण क्रिकेट विश्वात उत्सुकता वाढली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पर्थमध्ये खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी जगभरातील दिग्गज कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. मॅथ्यू हेडन, रवी शास्त्राr, सुनील गावसकर, वसीम अक्रम, मुरली विजय, रसेल अरनॉल्ड आणि मार्क निकोल्स यांची इंग्लिश कॉमेंट्रीसाठी निवड करण्यात आली. हिंदी कॉमेंट्रीची जबाबदारी रवी शास्त्राr, वसीम अक्रम, चेतेश्वर पुजारा, सुनील गावसकर, संजय मांजरेकर, जतीन सप्रू आणि दीपदास गुप्ता यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

►भारत : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, नितीशकुमार रेड्डी , मोहम्मद सिराज, आकाश दीप, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अभिमन्यू ईश्वरन, वॉशिंग्टन सुंदर.

►ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

सामन्याची वेळ : (भारतीय वेळेनुसार) सकाळी 7:50 वा.

प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, हॉटस्टार.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article