भारत-आस्ट्रेलिया पहिली हॉकी कसोटी आज
वृत्तसंस्था/ पर्थ
यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत हॉकी संघामध्ये पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेला येथे शनिवारपासून प्रारंभ होत आहे. अलीकडच्या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीत सातत्य असले तरी येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.
पॅरीस ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाने गेल्या काही दिवसापासून आपल्या सरावावर अधिक भर दिला आहे. तसेच या संघाला हॉकी इंडियाने सरावाकरिता विदेशी दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्याचा लाभ भारतीय हॉकी संघाला मिळेल अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियन हॉकी संघ जगातील एक दर्जेदार म्हणून ओळखला जातो. आगामी हॉकी कसोटी मालिका चुरशीची अपेक्षीत असून दोन्ही संघांकडून दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडेल. भारतीय हॉकी संघाला क्रेग फुल्टॉन यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत गेल्या दशकामध्ये भारतीय हॉकी संघाला कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र यावेळी भारतीय हॉकी संघ ही मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास फुल्टॉन यांनी व्यक्त केला आहे. भारतीय हॉकी संघाने 2014 साली शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. तर फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेत हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी निश्चितच उठावदार झाली आहे. या संघामध्ये काही नवोदित हॉकीपटूंनाही आपला दर्जा सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. भुवनेश्वरमध्ये झालेल्या प्रो लिग हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने चारपैकी तीन सामने निर्धारित वेळेत जिंकले आहेत तर राऊरकेला येथे भारतीय हॉकी संघ अपराजित राहिला. दरम्यान या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाबरोबरचे दोन्ही सामने गमवावे लागले होते. या पराभवाची परतफेड करण्याची संधी या कसोटी मालिकेत उपलब्ध झाली आहे.
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष हॉकीच्या ड्रॉमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरची संधी गमवून चालणार नाही. भारतीय हॉकी संघ या मालिकेत सांघिक कामगिरीवर अधिक भर देणार असून भारतीय संघाने पेनल्टी कॉर्नरवर अधिक सराव केल्याचे कर्णधार हरमनप्रित सिंगने म्हटले आहे. 2013 पासून ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघामध्ये आतापर्यंत एकूण 43 सामने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नोंदीनुसार झाले असून त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 28 वेळा विजय नोंदवला असून भारताने 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. उभय संघातील 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या सांघिक मानांकनात सध्या भारत चौथ्या तर ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे.