भारत अ संघाचा दहा गड्यांनी दणदणीत विजय
गुरनूर ब्रारचे सामन्यात दहा बळी : भारत अ चा लंका अ संघावर कसोटी मालिका विजय
वृत्तसंस्था, गॅले
दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेत भारत अ संघाने यजमान लंका अ संघाचा 1-0 असा पराभव केला. या मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत भारत अ संघाने लंका अ संघाचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला. वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने या सामन्यात 10 गडी बाद केले.
या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. या दुसऱ्या कसोटीत लंका अ संघाने पहिल्या डावात 366 धावा जमविल्यानंतर भारत अ संघाचा पहिला डाव 543 धावांवर आटोपला. भारत अ संघाने पहिल्या डावात 177 धावांची भक्कम आघाडी मिळविली. सलामीच्या साई सुदर्शनने 22 चौकारांसह 168 धावांची खेळी केली. पडीकलने 11 चौकारांसह 94, सारांश जैनने 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 70, कर्णधार जुरेलने 6 चौकारांसह 53, शेख रशिदने 5 चौकारांसह 45 तर अकिब नबीने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 30 धावा जमविल्या. लंका अ संघातील नुवांताने 5 तर सुदिराने 3 गडी बाद केले.
रविवारी खेळाच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी गुरनूर ब्रारच्या भेदक गोलंदाजीसमोर लंका अ संघाचा दुसरा डाव 209 धावांत आटोपला. अशीन बंदाराने 2 षटकार आणि 11 चौकारांसह 87 तर नुवांताने 4 चौकारांसह 26 व सुदीराने 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. ब्रारने 68 धावांत 6 गडी बाद केले. सारांश जैनने 2 तर यश ठाकुर व अकिब नबी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. लंका अ संघाच्या पहिल्या डावात ब्रारने 77 धावांत 4 गडी बाद केले होते. भारत अ संघाला निर्णायक विजयासाठी 33 धावांची गरज होती. साई सुदर्शन आणि अमन मोखाडे या सलामीच्या जोडीने 6.2 षटकात बिनबाद 36 धावा जमवित आपल्या संघाला हा सामना 10 गड्यांनी जिंकून दिला. सुदर्शनने 4 चौकारांसह नाबाद 25 तर मोखाडेने 1 चौकारासह नाबाद 11 धावा केल्या.
भारत अ संघाचा लंका दौरा चांगलाच यशस्वी ठरला. भारत अ संघाने या दौऱ्यात तिरंगी मालिका जिंकली होती. तर उभय संघातील पहिली अनधिकृत कसोटी अनिर्णित राहिली होती. आता भारत आणि लंका यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका ऑगस्ट महिन्यात होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी गॅलेच्या मैदानावर 15 ऑगस्टपासून तर दुसरी कसोटी 23 ऑगस्टपासून कोलंबोच्या एसएससी मैदानावर खेळविली जाईल.
संक्षिप्त धावफलक - श्रीलंका अ प. डाव सर्वबाद 309, भारत अ प. डाव 9 बाद 543 (साई सुदर्शन 168, पडीकल 94, जुरेल 53, सारांश जैन नाबाद 70, नबी 30, शेख रशिद 45, अवांतर 29, केशरा नुवांता 5-159, सुदिरा 3-102), लंका अ दु. डाव सर्वबाद 209 (अशिन बंदारा 87, नुवांता 26, सुदिरा 21, ब्रार 6-68, जैन 2-66, यश ठाकुर व नबी प्रत्येकी 1 बळी).