इंडिया अ चा डाव 348 धावांत समाप्त
वृत्तसंस्था / नॉर्दम्पटन
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अनाधिकृत कसोटी सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत इंग्लंड लायन्सने पहिल्या डावात 2 बाद 146 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी इंडिया अ चा पहिला डाव 348 धावांत संपुष्टात आला.
या सामन्यात इंडिया अ च्या पहिल्या डावात के. एल. राहुलने 116 तर ज्युरेलने 52 धावांचे योगदान दिले. करुण नायरने 40 तर नितीशकुमार रेड्डी ने 34 धावा जमविल्या. इंग्लंड लायन्स संघातील ख्रिस वोक्सने 60 धावांत 3 तर हिलने 56 धावांत 2 गडी बाद केले. इंडिया अ ने 7 बाद 319 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटचे तीन गडी 29 धावांची भर घालत तंबूत परतले. शुक्रवारी नाबाद राहिलेला कोटीयान याने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. कंबोज केवळ 2 धावांवर बाद झाला. तुषार देशपांडेने 11 धावा केल्या.
त्यानंतर इंग्लंड लायन्सने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली आणि उपाहारापर्यंत 16 षटकात 1 बाद 58 धावा जमविल्या. टॉम हेन्स 28 धावांवर खेळत होता. इंडिया अ संघातील गोलंदाज कंबोजने इंग्लंड लायन्सच्या बेन मिकेनीला 12 धावांवर यष्टीरक्षक ज्युरेलकरवी झेल बाद केले. खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर इंग्लंड लायन्सने आणखी एक गडी गमविला. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने टॉम हेन्सला 54 धावांवर बाद केले. हेन्सने गे समवेत दुसऱ्या गड्यासाठी 94 धावांची भागिदारी केली. चहापानावेळी इंग्लंड लायन्सने 33 षटकात 2 बाद 146 धावा जमविल्या असून अद्याप हा संघ 202 धावांनी पिछाडीवर आहे. चहापानापूर्वी पावसाच्या तुरळक सरी आल्याने काही वेळ खेळ थांबवावा लागला होता. हेन्सने 88 चेंडूत 9 चौकारांसह 54 धावांचे योगदान दिले. गे 46 धावांवर खेळत आहे. कंबोज आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: इंडिया अ प. डाव 348 (के. एल. राहुल 116, करुण नायर 40, ज्युरेल 52, नितीशकुमार रे•ाr 34, वोक्स 3-60, हिल 2-56), इंग्लंड लायन्स प. डाव 33 षटकात 2 बाद 146 (हेन्स 54, मिकेनी 12, गे खेळत आहे 46, अनशुल कंबोज आणि तुषार देशपांडे प्रत्येकी 1 बळी)