भारत-पाक युवा संघात आज लढत
वृत्तसंस्था/ बुलावायो
19 वर्षाखालील वयोगटाच्या सुरु असलेल्या पुरुषांच्या आयसीसी विश्वचषक वनडे क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे भारत आणि पाक या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीचा सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार दु. 1 वाजता प्रारंभ होईल.
भारतीय युवा संघाने आतापर्यंत आयसीसीची युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 5 वेळेला जिंकली आहे. मात्र दुबईत 19 वर्षाखालील वयोगटातील झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव करुन विजेतेपद मिळविले होते. या मागिल पराभवाची परतफेड करण्यासाठी आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघ सज्ज झाला आहे. झिंब्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरु असलेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाक या दोन्ही संघांनी यापूर्वी सुपर-6 फेरी निश्चित केली होती. रविवारच्या सामन्यात भारतीय संघ पाक संघाबरोबर हस्तांदोनल न करण्याची भूमीका कायम राखतील.
या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अॅरॉन जॉर्ज, कुंडू, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, कर्णधार म्हात्रे आणि विहान मल्होत्रा हे प्रमुख फलंदाज आहेत. अंबरीश, खिलान पटेल, हेनिल पटेल, कनिक्ष चौहान यांच्यावर गोलंदाजीची फिस्त राहिल. पाक संघाचे नेतृत्व फरहान युसूफ करीत आहे. या स्पर्धेमध्ये यष्टीरक्षक कुंडूने चार सामन्यातून 183, वैभव सूर्यवंशीने चार सामन्यातून 166, विहान मल्होत्राने चार सामन्यातून 151 धावा जमविल्या आहेत. हेनिल पटेलने चार सामन्यातून 10 तर उद्धव मोहनने झिंब्बाब्वे विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 3 गडी बाद केले होते. अंबरिशनेही या स्पर्धेत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. या स्पर्धेत भारतीय युवा संघाने आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेचा 6 गड्यांनी पराभव केला. त्यानंतर त्यांनी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांना पराभूत करुन आपल्या गटातून सर्वप्रथम सुपर-6 फेरीत प्रवेश मिळविला. तर गेल्या मंगळवारच्या सामन्यात भारताने यजमान झिंब्बाब्वेला मोठ्या फरकाने पराभूत करुन आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.