For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंद-प्रशांत क्षेत्रात सहकार्य वाढविणार भारत अन् केनिया

06:45 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
हिंद प्रशांत क्षेत्रात सहकार्य वाढविणार भारत अन् केनिया
Advertisement

केनियाचे राष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर : पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था~ / नवी दिल्ली

केनियाचे राष्ट्रपती विलियम रुतो यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाउसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याशी मंगळवारी द्विपक्षीय चर्चा केली आहे. या चर्चेनंतर दोन्ही देशांकडून संयुक्त वक्तव्य जारी करण्यात आले. भारत आणि केनियाने मागील शतकात वसाहतवादी शक्तींशी लढा दिला. दोन्ही देशांचा संयुक्त इतिहास आणि भविष्य आहे. विकासात्मक भविष्याचा पाया रचत आम्ही द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टीने अनेक नवे पुढाकार हाती घेण्यात आले आहेत असे उद्गार पंतप्रधना मोदींनी काढले आहेत. भारत आणि केनियाने हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

दोन्ही देशांदरम्यान सागरी सहकार्यावर चर्चा झाली आहे. तसेच दोन्ही देश हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात सहकार्य करणार आहेत. याचबरेबर दहशतवादविरोधात दोन्ही देश सहकार्य वाढविणार आहेत. भारत आणि केनियाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीक्षेत्रावर आधारित आहे. आम्ही केनियाला कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास तयार आहोत. केनियाला भारताकडून 250 दशलक्ष डॉलर्सची कर्जसुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातही आम्ही सहकार्य वाढविणार आहोत. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, अक्षय उर्जेच्या क्षेत्रातही सहकार्य वाढवू असे मोदींनी म्हटले आहे.

केनियाने ग्लोबल बायोफ्यूल अलायन्स आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. केनियातील सुमारे 80 हजार भारतीय वंशाचे लोक द्विपक्षीय संबंधांची सर्वात मोठी शक्ती आहेत असेही मोदींनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली आहे. जी-20 चे यशस्वी आयोजन आणि त्यात आफ्रिकन महासंघाला सामील करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे मी आभार मानतो. भारत आणि केनियाचा संयुक्त वारसा आणि इतिहास आहे. 1911 मध्ये पहिल्यांदा भारतीय केनियात पोहोचला होता. तर आता केनियाचे नागरिक उपचारासाठी भारतात येत आहेत. भारतीय राष्ट्रीय कृषी आणि  ग्रामीण बँक शेतकऱ्यांना कर्ज प्रदान करण्यासाठी आमच्या फार्म फायनान्शियल बोर्डासोबत काम करणार आहे. यामुळे आम्हाला अन्नसुरक्षेच्या आव्हानावर मात करण्यास मदत होणार असल्याचे केनियाचे राष्ट्रपती रुतो यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती भवनात स्वागत

केनियाचे राष्ट्रपती रुतो हे सोमवारी भारतात दाखल झाले होते. रुतो यांचे मंगळवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी औपचारिक स्वागत केले. यादरम्यान पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. केनियाचे राष्ट्रपती तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे आहे.

Advertisement
Tags :

.