भारतालाही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार
विदेशमंत्र्यांनी अमेरिकेला सुनावले : भारताच्या अंतर्गत विषयांवरील टिप्पणीचे प्रकरण
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारताच्या अंतर्गत विषयांवर टिप्पणी करणाऱ्या अमेरिकेला विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी ठोस प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा भारत जेव्हा स्वत:च्या अंतर्गत विषयांवरील अमेरिकेच्या टिप्पणींवर प्रतिक्रिया व्यक्त करतो, तेव्हा अमेरिकेने वाईट मानू नये असे जयशंकर यांनी सुनावले आहे. जयशंकर यांनी अमेरिकन थिंक टँक कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरादाखल जर तुम्ही दोन देश, दोन सरकारांच्या स्तरावर पाहिल्यास लोकशाहीचा परस्पर सन्मान होणे आवश्यक असल्याचे आम्हाला वाटते असे म्हटले आहे.
एका लोकशाहीला दुसऱ्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार असेल आणि हे जागतिक स्तरावर लोकशाहीला चालना देण्याचा हिस्सा असेल, तर दुसरीकडे दुसऱ्या देशाने असे केले तर त्याला विदेशी हस्तक्षेप ठरविले जाते, हा प्रकार चुकीचा आहे. विदेशी हस्तक्षेप हा विदेशी हस्तक्षेप आहे, भले मग तो कुणीही करो आणि कुठेही करो. याचमुळे हे एक कठिण क्षेत्र आहे. इतरांना टिप्पणी करण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांच्या टिप्पणीवर टिप्पणी करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. याचमुळे मी जेव्हा प्रत्युत्तर देत असतो, तेव्हा वाईट मानून घेऊ नये असे जयशंकर यांनी अमेरिकेला उद्देशून म्हटले आहे.
अमेरिकेच्या नेत्यांकडून भारतासंबंधी टिप्पणी
अमेरिका आणि भारत हे लोकशाहीवादी शासन असलेल्या अग्रगण्य देशांपैकी एक आहेत. अमेरिकेत भारतीय लोकशाहीसंबंधी चर्चा होते. तर अनेकदा अमेरिकेचे नेते भारताच्या लोकशाहीबद्दल टिप्पणी करतात. जग अत्यंत जागतिक झाले असून याच्या परिणामादाखल कुठल्याही देशाचे राजकारण त्याच्या राष्ट्रीय सीमांमध्येच राहिलच असे नाही. असे घडू नये याकरता अमेरिका निश्चितपणे विशेष प्रयत्न करतो असा दावा जयशंकर यांनी केला आहे.
प्रत्येक गोष्ट आता ग्लोबल
गोष्टी अन् स्थिती आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. जग आता एक ध्रूवीय राहिलेले नाही. आता एका जागतिकीकरण झालेल्या युगात जागतिक अजेंडा देखील ग्लोबलाइज्ड आहेत. यामुळे केवळ स्वत:चा देश किंवा स्वत:च्या क्षेत्राच्या राजकारणाला आकार देऊ पाहणारे पूर्ण जगावर प्रभाव पाडत असतात. सोशल मीडिया, आर्थिक शक्ती आणि वित्तीय प्रवाह संबंधितांना असे करण्याची संधी देतात असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
चीनकडून कराराचे उल्लंघन
चीनने भारतासोबतच्या सीमा करारांचे उल्लंघ केले आहे. दोन्ही देशांमधील तणाव कायम राहिल्यास उर्वरित संबंधांवरही स्वाभाविकपणे प्रभाव पडणार आहे. सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान करार झाले होते आणि चीनने या करारांचे उल्लंघन केले आहे. आम्ही सैन्याला सीमेवर तैनात केले आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोवर तणाव कायम राहणार असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.