विधानसभेत विरोधी पक्षनेता द्यावा, India Aaghadi तर्फे आंदोलन, नार्वेकरांचा निषेध
विरोधी पक्षनेते पद द्यायला हवे होते, पण दिले नाही...
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता द्यावा या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीने मंगळवारी शाहू समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे सभापती राहुल नॉर्वेकर, यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. पण विधानसभेत अजून विरोधी पक्षनेते पद दिलेले नाही. विरोधी पक्षाकडून विरोधी पक्षनेता पद देण्याची मागणी करुनही पद दिले जात नाही. यामुळे इंडिया आघाडीच्या वतीने सरकारच्या धोरणाच्या विरोधात आणि विरोधी पक्षनेते पद द्यावे या मागणीसाठी नर्सरी बागेतील शाहू समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती राहुल नॉर्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उध्दव ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, विरोधी पक्षनेते पद द्यायला हवे होते, पण दिले नाही.
विरोधी पक्षनेते पद द्यायला सरकार घाबरते आहे.काँग्रेसचे सचिन चव्हाण म्हणाले, ईव्हीएम घोटाळा करुन महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस येईल म्हणून विरोधी पक्षनेते पद दिले जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील म्हणाले, राज्य सरकार हिटलरशाही पध्दतीने वागत आहे.
या आंदोलनात उबाठाचे विजय देवणे, दिलीप पवार, शेकापचे बाबासाहेब देवकर, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, प्रा. टी. एस.पाटील, भरत रसाळे, सतीशचंद्र कांबळे, डी.जी.भास्कर, ईश्वर परमार, रघुनाथ कांबळे, युवा सेनेचे मंजित माने, वैशाली महाडिक यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.