इंडिया आघाडीचे आता बेंगळुरात आंदोलन
उद्या फ्रीडम पार्कवर करणार निदर्शने : एसआयआर प्रक्रिया रद्द करणे, निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
त. भा. प्रतिनिधी बेंगळूर :
नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या रॅलीनंतर, ‘इंडिया’ आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपली मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून, 5 नोव्हेंबर रोजी बेंगळूर येथील फ्रीडम पार्कवर मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जातील, अशी घोषणा नेत्यांनी मंगळवारी केली.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद म्हणाले, बेंगळूरमध्ये होणारे हे राज्यस्तरीय आंदोलन म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या निदर्शनांचाच पुढील टप्पा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. बेंगळूरनंतर हे आंदोलन जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत नेले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव के. प्रकाश म्हणाले, इंडिया आघाडीच्या प्रमुख मागण्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया त्वरित रद्द करणे, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेचे लोकशाहीकरण करणे यांचा समावेश आहे. निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हितासाठी काम करत असून जनतेचा मतदानाचा अधिकार धोक्यात आला आहे, असा आरोप करत इंडिया आघाडीने यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात प्रतिकात्मक ‘जन-महाभियोग’ घडवून आणला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यासारख्या प्रमुख नेत्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांनी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले.
