इंडिया आघाडी म्हणजे घमंडीया आघाडी...आयोध्येचे निमंत्रण नाकारून देशातील भक्तांचा काँग्रेसकडून अपमान
आयोद्धेतील राम मंदिराच्या उद्धाटनाचे निमंत्रण नाकारून काँग्रेसने देशातील नागरिकांचा अपमान केला आहे. त्यांची इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे अशी जोरदार टिका केंद्रिय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर केली आहे.
दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विकसित भारत संकल्प रथयात्रा कार्यक्रम घेतला. कोल्हापूरात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार त्यांनी कागलमधील विठ्ठल रुक्मणि मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली.
आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, "काही ठिकाणी संकल्प भारत यात्रेचा रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला. ही यात्रा रोखणारे हे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत. ते सर्वसामान्य नागरिक नाहीत. गेल्या 50 वर्षात जे घडलं नाही ते आता मोदी सरकार आल्यामुळे घडत आहे. म्हणून महाविकास आघाडीला खुजली आलेली आहे." असाही आरोप त्यांनी केला.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणेचं निमंत्रण काँग्रेस पक्षाने नाकारल्याचं सांगताना सिंधिया म्हणाले, "काँग्रेसने आयोध्येमध्ये होणाऱ्या सोहऴ्याचं निमंत्रण नाकारून स्वत:ची विचारधारा स्पष्ट केलेली आहे. काँग्रेस स्वत: रामाचे अस्तित्व असल्याचा पुरावा मागतो. तर इंडिया आघाडीमधला एक सहयोगी पक्ष सनातन धर्म नष्ट करण्यास सांगतो. त्यांची ही मानसिकता आहे."
शेवटी बोलताना त्यांनी, "इंडिया आघाडी म्हणजे घमंडीया गटबंधन आहे. आयोध्या कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारून देशातील भक्तांचा अपमान केला आहे. काँग्रेसने फक्त देशातील 140 कोटी जनतेचाच नाही तर जगभरात राहणारा रामाला मानणाऱ्या भक्तांचा अपमान केला आहे. येत्या काळात जनता त्यांना धडा शिकवेल."असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.