For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-द.आफ्रिका महिलांचा दुसरा सामना पावसामुळे रद्द

06:34 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत द आफ्रिका महिलांचा दुसरा सामना पावसामुळे रद्द
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

मुसळधार पावसाचा व्यत्यय आल्याने भारत व दक्षिण आफ्रिका महिलांचा दुसरा टी-20 सामना रद्द करण्यात आला. द.आफ्रिकेने 20 षटकांत 6 बाद 177 धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर पावसास प्रारंभ झाल्याने खेळ होऊ शकला नाही.

या निकालामुळे द.आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेतील 1-0 ही आघाडी कायम राखली असून शेवटचा सामना आज मंगळवारी होणार आहे. त्यांना मालिका जिंकण्याची तर भारताला मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. भारतीय महिला संघाने मायदेशात क्वचितच मालिका गमावली आहे.

Advertisement

पावसामुळे सामना 15 मिनिटे उशिराने सुरू झाला. पण खेळ सुरू झाल्यानंतर तीनदा हलक्या पावसाचा अडथळा आला. मात्र खेळ पुढे चालू राहिला. आफ्रिकेचा डाव संपल्यानंतर मात्र मुसळधार पाऊस सुरू झाल्याने खेळ होऊ शकला नाही. पंचांनी नंतर हा सामना रद्द झाल्याचे जाहीर केले.

भारताकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर द.आफ्रिकेने तझमिन ब्रिट्सचे अर्धशतक व अॅनेक बॉशच्या समयोचित 40 धावा यांच्यामुळे निर्धारित 20 षटकांत 6 बाद 177 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. ब्रिट्सने 39 चेंडूत 52 तर अॅनेक बॉशने 32 चेंडूत 40 धावा फटकावल्या. ब्रिट्सने लॉरा वुलव्हार्टसमवेत 43 धावांची सलामी दिली. पूजा वस्त्रकरने पाचव्या षटकात वुलव्हार्टला बाद करून ही जोडी फोडली. वुलव्हार्टने 12 चेंडूत 22 धावा फटकावल्या. ब्रिट्सने नंतर मेरिझान कॅपसमवेत जलद भागीदारी करीत पॉवरप्लेमध्ये 66 धावांपर्यंत मजल मारून दिली. कॅपने 14 चेंडूत 20 धावा केल्या.

ब्रिट्सने नंतर 11 व्या षटकात टी-20 मधील 11 वे अर्धशतक नोंदवले. बॉशसह 38 धावांची भर घातल्यानंतर ब्रिट्स दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर यष्टिचीत झाली. 52 धावांच्या खेळीत तिने 6 चौकार, एक षटकार मारला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करीत आफ्रिकन खेळाडूंना फटकेबाजीपासून रोखले. त्यामुळे त्या स्वीप शॉटचा वारंवार वापर करीत होत्या. वस्त्रकरने शेवटच्या षटका डी क्लर्कला 14 धावांवर बाद केले. मात्र जेमिमा रॉड्रिग्जने अॅनेरी डर्कसेनचा झेल सोडल्याने त्याचा लाभ डर्कसेनने घेतला. तिने शेवटच्या तीन चेंडूवर सलग तीन चौकार ठोकत संघाला पावणेदोनशेचा टप्पा गाठून दिला. वस्त्रकर व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका महिला 20 षटकांत 6 बाद 177 : ब्रिट्स 39 चेंडूत 52, बॉश 32 चेंडूत 40, वुलव्हार्ट 12 चेंडूत 22, कॅप 14 चेंडूत 20, डी क्लर्क 9 चेंडूत 14, डर्कसेन 3 चेंडूत नाबाद 12, अवांतर 4. वस्त्रकर 2-37, दीप्ती शर्मा 2-20, श्रेयांका पाटील 1-37, राधा यादव 1-31.

Advertisement
Tags :

.